विश्लेषण : जामनेर विधानसभा मतदारसंघ
जळगाव (विशेष प्रतिनिधी) :- जामनेर विधानसभा मतदार संघामध्ये यंदा मंत्री गिरीश महाजन यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने भाजपमधून आलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप बळीराम खोडपे यांना तिकीट दिले आहे. प्रचारामध्ये खोडपे यांना मिळालेली लोकप्रियता पाहता यंदाचा निकाल नेमका कसा लागेल याकडे आता जनतेलाही उत्सुकता लागून राहिली आहे.
भाजपचे प्रभावशाली नेते मंत्री गिरीश महाजन हे १९९५ पासून जामनेर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. आता सातव्यांदा ते उमेदवारी करीत असून सलग ६ वेळा जिंकून आल्याचा विक्रम त्यांनी केला आहे. आता सलग ७ वेळा निवडून येण्याचा मान मिळवून जळगावचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या विक्रमाशी बरोबरी साधण्याची त्यांना संधी मिळाली आहे. २०१९ साली मंत्री गिरीश महाजन यांना १ लाख १४ हजार ७१४ एवढी मते मिळाली होती. तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय गरुड यांना ७९ हजार ७०० मते मिळाली होती
जामनेर विधानसभा मतदारसंघात ३ लाख ३५ हजार ४७४ एकूण मतदार असून पुरुष १ लाख ७२ हजार २३२ तर महिला १ लाख ६३ हजार ४१ याशिवाय १ तृतीयपंथीय मतदार आहे. पूर्वाश्रमीचे भाजपचे कार्यकर्ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले दिलीप बळीराम खोडपे यांना यंदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळाल्याने तगडा प्रतिस्पर्धी गिरीश महाजन यांच्यासमोर उभा करण्याची संधी विरोधकांना मिळाली आहे. प्रचारांमध्ये देखील दिलीप खोडपे यांना चांगली पसंती दिसून आली.
यंदा मंत्री गिरीश महाजन हे सातव्यांदा विजयी होऊन माजी मंत्री सुरेशदादा यांच्या विक्रमाशी बरोबरी करतील की मतदारसंघाला नवीन उमेदवार आमदार म्हणून मिळेल याबाबत जनतेमध्ये उत्सुकता लागली असून निकालाच्या दिवशी खरे चित्र स्पष्ट होणार आहे. तसेच मतदानाची टक्केवारी देखील खूप काही सांगून जाणार आहे. इतर प्रमुख उमेदवार मतदार संघात दिसून येत नसल्यामुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता नाही.