पालकांकडून रुपयाही न घेता, कॉस्च्युम वगळून विद्यार्थ्यांनी सादर केले कलागुण
जामनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील कोदोली गावातील पहिली ते चौथीच्या जिल्हा परिषद शाळेचा स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात पार पडला. शाळा व्यवस्थापन समिती आणि जिंदगी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. शाळेमध्ये गावातील मुले शिकतात. या मुलांच्या पालकांकडून एकही रुपया न घेता स्नेहसंमेलन सोहळा घेण्यात आला.
विद्यार्थ्यांकडे असलेल्या कपड्यांवरून नृत्य आणि नाटकं बसवण्यात आली. जेणेकरून पालकांना कॉस्च्युम घेण्याचा खर्च पडू नये. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने कार्यक्रमात भाग घेतला. कार्यक्रमातील डान्स गावातीलच मुली खुशी कोळी आणि अमृता महाजन यांनी बसवले. तसेच गाण्यांना संगीत देण्याचे काम रतन आव्हाड आणि सोपान आव्हाड यांनी केले यासाठी कोणीही मानधन घेतले नाही.
कार्यक्रमाला विद्यार्थ्यांच्या पालकांचा पेन देऊन सत्कार करण्यात आला. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांचा प्रवेश घेतल्याबद्दल पालकांचे आभार मानण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून तसेच त्यांच्यावरील पोवाडा म्हणून करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी पोवाडा, लावणी, प्रार्थना, वेस्टन डान्स, देशभक्तीपर गीत, हागणदारी मुक्त गावावरील नाटिका असे विविध कार्यक्रम सादर केले. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये महाराष्ट्राची पुरोगामी परंपरा दाखवण्यात आली.
गावकऱ्यांकडून मुलांना अनेक बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाला मुख्याध्यापक धुडकू परदेशी, शिक्षक नितीन पाटील आणि वैशाली पाटील तसेच गावचे सरपंच विजयेंद्र पाटील आणि गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय पाटील यांनी केले तर बक्षीस वितरण जिंदगी फाउंडेशनच्या अध्यक्षा सुष्मिता भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले.