खादगाव-आंबीलहोळ रस्त्यावर भीषण अपघात
जळगांव (प्रतिनिधी) :- जामनेर तालुक्यातील एमआयडीसी खादगाव ते आंबीलहोळ रस्त्यावर आज मंगळवारी दि. २० मे रोजी दुपारी ट्रॅक्टरचा ताबा सुटल्याने वाहन खोल खड्यात कोसळले. या दुर्घटनेत ट्रॅक्टर चालकाचा ट्रॅक्टरच्या खाली दबून जागीच मृत्यू झाला.
गुलाब जमा चव्हाण (वय ३५,रा.आंबीलहोळ ता. जामनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो गावात आई, वडील, पत्नी, २ मुले यांच्यासह राहत होता. ट्रॅक्टर चालक म्हणून काम करीत परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता.(केसीएन)मंगळवारी गुलाब चव्हाण हे कामावर गेले होते. तेथे ट्रॅक्टर घेऊन जात असताना ट्रॅक्टर उलटल्यामुळे गुलाब चव्हाण हे वाहनाबरोबर खालच्या खड्यात पडले. अपघात इतका भीषण होता की ट्रॅक्टर थेट त्यांच्या अंगावर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच आरोग्यदूत जालमसिंग राजपूत, कैलास पालवे, बाळू चव्हाण, नटवर चव्हाण आणि इतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य हाती घेतले. गंभीर अवस्थेत असलेल्या चालकाला उपजिल्हा रुग्णालय, जामनेर येथे तातडीने हलविण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.(केसीएन)यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला. या घटनेमुळे अंबिलहोळ गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. जामनेर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते.