केंद्रप्रमुख हेमंत पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण
वावडदा (वार्ताहर) :- जामनेर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, वडाळी दिगर येथे “एक पेड माँ के नाम” या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वाकोद केंद्राचे केंद्रप्रमुख हेमंत पाटील यांची विशेष उपस्थिती होती.
शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक संदिप पाटील यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपक्रमाविषयी माहिती देताना सांगितले की, एक पेड माँ के नाम हा उपक्रम जागतिक पर्यावरण दिनापासून देशभरात सुरु आहे.हा उपक्रम आपल्या मातृभूमी आणि निसर्गाबद्दलचा आपला आदर आणि समर्पण दर्शवितो.या मोहिमेचा उद्देश आईच्या नावाने एक झाड लावणे आणि एक चिरस्थायी स्मृती निर्माण करणे आहे, जे केवळ पर्यावरणाचे रक्षण करणार नाही तर हिरवेगार आणि अधिक समृद्ध भविष्य घडवण्यास देखील हातभार लावेल. केंद्रप्रमुख हेमंत पाटील यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना झाडांचे महत्त्व सांगितले. वृक्षांचे जतन व संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी देखील या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले. वृक्षारोपण प्रसंगी उपशिक्षक चंद्रशेखर पाटील, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.