संशयित आरोपीस शिताफिने अटक ; पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जळगावरोडवरील चिंचखेडा येथे गुन्हेगारी वृत्तीच्या असलेल्या तरुणाने एकटी असलेल्या महिलेला घरात एकटे गाठून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. महिलेने प्रतिकार करताच लोखंडी वस्तू डोक्यात टाकून तरुणाने निर्घृण खून केल्याची घटना बुधवारी ८ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली आहे.
संशयित आरोपीचे विशाल ज्ञानेश्वर साबळे (वय २३) असे नाव आहे. चिंचखेडा गावात महिलेला एकटी पाहून वाईट हेतूने तो घरात घुसला. मात्र हेतू साध्य न झाल्याने त्याने महिलेच्या डोक्यात लोखंडी अवजाराने वार करून निर्घुण खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे व त्यांच्या पोलीस पथकाने याप्रकरणी आरोपीस अवघ्या चोवीस तासात पकडण्यात यश मिळविले आहे. या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
सोमवारी चिंचखेडा गावी लग्न असल्याने गाव पंगत होती. सायंकाळचे सहा वाजले. अंधार पडायला लागला. मयत महिलेचा चुलत सासरा सायंकाळी बकऱ्या चारून घरी परतला. घराच्या दरवाज्याला कडी पाहून सुनबाई कुठे बाहेर गेली असावी म्हणून सासर्याने दरवाज्याची कडी उघडून घरात प्रवेश केला. घरात प्रवेश करताच त्यांना सुनबाई किचनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पडलेली आढळून आली. त्यांनी एकच टाहो फोडला. बघता बघता वाऱ्यासारखी ही घटना गावात पोहचली. घटनास्थळी एकच गर्दी झाली .जामनेर पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक किरण शिंदे हे आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.
आपल्या वरिष्ठांना त्यांनी माहिती कळविली .घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक लॅब पथक, एलसीबी पथक, फिंगरप्रिंट्स पथक , श्वान पथक अशा विविध क्राईम डिपार्टमेंटच्या तपास यंत्रणेला पाचारण करण्यात आले .
मयत महिलेचा पती सुरेश पाटील हा जामनेर येथे चहाची हॉटेल लावून व्यवसाय करतो. त्यामुळे तो सकाळीच घरून व्यवसायासाठी गेला होता. मयत महिलेचा मुलगा शाळेत गेलेला होता. सासू ही बाहेरगावी गेलेले होते. या संधीचा फायदा घेऊन गावातील गावगुंड व दारुड्या म्हणून ओळखला जाणारा तरुण आरोपी विशाल नाना साबळे (वय २३) याने वाईट हेतूने हे कृत्य केले आहे.
संशयित आरोपी विशाल नाना साबळे
सदर महिलेची हत्या करून संशयित आरोपीने बाहेरून कडी लावून तो गावातून दुसऱ्या तालुक्यात पसार झाला होता. मात्र पोलीस निरीक्षक किरण शिंदे व त्यांच्या पोलीस पथकाने रात्रभर संपूर्ण गाव पिंजून काढून वेगवेगळ्या अँगलने या कामी तपास सुरू केला. रात्री सव्वा तीन वाजेच्या सुमारास या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण शिंदे तसेच पोलीस निरीक्षक किसन पाटील यांच्यासह पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने गुप्त यंत्रणेच्या सहाय्याने या गुन्ह्याचा तपास लावला.