जामनेर तालुक्यातील घटना
जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका गावातील १२ वर्षीय मुलगी ही गायरानात बकऱ्या चरण्यासाठी गेली होती. त्यावेळेला एका संशयित तरुणाने तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला. या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गावातील मुलीच्या ४२ वर्षीय वडिलांनी आज शुक्रवारी दि. २० सप्टेंबर रोजी फिर्याद दिली आहे. ते गावात आई, पत्नी तसेच पाच मुलांसह राहतात. मजुरी काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. त्यांची १२ वर्षाची मुलगी गायरानात बकऱ्या चारण्यासाठी जात असते. दरम्यान गुरुवारी दि. १९ सप्टेंबर रोजी त्यांची मुलगी बकऱ्या चारण्यासाठी गेली असता पाच वाजेच्या सुमारास संशयित आरोपी सागर अनिल कोळी हा तिच्याजवळ आला.त्याने तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे गैरकृत्य तिच्यासोबत केले. त्यानंतर तिने घरी आल्यानंतर तिच्या परिवाराला माहिती दिली. तिच्या पित्याने जामनेर पोलीस स्टेशन येथे धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अल्पवयीन तरुणीवर अत्याचार व विनयभंगाच्या घटनांमुळे जामनेर तालुक्यातील समाजमन ढवळून निघाले आहे.