जामनेर ( प्रतिनिधी ) – येथील खिदमतगार फलाही एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीकडून कर्नाटक सरकारचा निषेध करणारे निवेदन जामनेरच्या तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना आज पाठवण्यात आले . या संस्थेने कर्नाटक राज्यातील विशिष्ट पद्धतीने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गणवेशाची सक्ती करणारा नियम रद्द करावा अशी मागणी केली आहे .
या निवेदनात पुढे म्हटले आहे की , कर्नाटकातील कुंडपुरा येथील शासकीय महाविद्यालयात विशिष्ट गणवेशाची सक्ती करून मुस्लिम विद्यार्थिनींच्या बुरख्यावर बंदी घालण्यात आली आहे . त्यानंतर परिस्थिती चिघळल्याने या विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत आहे . भारतीय राज्यघटनेने सर्व धर्मियांना त्यांच्या धर्मानुसार आचरणाचे स्वातंत्र्य दिले आहे . तथापि कर्नाटकातील भाजप सरकार त्या राज्यात जातीय मतभेद वाढवण्याचा प्रयत्न मुद्दाम करीत आहे . त्याचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत .