जामनेर शहरातील घटना, तणावपूर्ण शांतता
जळगाव (प्रतिनिधी): जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील २१ वर्षीय तरुणाला अज्ञात कारणावरून बेदम मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सायंकाळी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह आणल्यानंतर समाजाने पोलीस स्टेशनला घेराव घातला. त्या ठिकाणी परिस्थिती नियंत्रण असून अतिरिक्त कुमक जामनेर शहरात मागवण्यात आलेली आहे.
जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथे राहणाऱ्या सुलेमान रहीम खान पठाण (वय २१) याने सकाळी वडील व आजोबांसोबत शेतातील काम केले. यानंतर जामनेर येथे पोलीस भरतीचा अर्ज भरून येतो असं सांगून तो घरातून निघाला. तिथून एका कॅफेवर असताना काही लोकांना त्याचा अज्ञात कारणावरून संशय आला आणि त्यांनी सुलेमानला बेदम मारहाण केली.(केसीएन)जमावाने मारहाण करत त्याला बेटावद खुर्द या गावाच्या बाहेरील बस स्थानकाजवळ सोडून दिले.
गंभीर जखमी अवस्थेत सुलेमान घरी पोहोचला व कुटुंबियांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. पाणी प्यायल्यानंतर काही वेळातच तो भोवळ येऊन कोसळला. घाबरलेल्या नातेवाईकांनी सुलेमानला तात्काळ जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.(केसीएन)याघटनेची माहिती मिळताच समाजाने पोलीस स्टेशनला घेराव घातला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी हे जामनेर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आहेत. या ठिकाणी पाच एसआरपीच्या तुकड्या पाठवण्यात आलेले आहेत व अतिरिक्त कुमकही त्या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे.
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवण्यास सुरुवात केलेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी २ संशयितांना ताब्यात घेतल्याचे समजते. तर ८ जणांची ओळख पटली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. एलसीबीसह सर्व यंत्रणा संशयित आरोपींच्या मागावर असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान या घटनेमुळे पुन्हा एकदा शांततेच्या परिस्थितीत असलेले जामनेर अशांत झाल्याचे दिसून आले. जामनेर पोलीस स्टेशनला उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते.