श्रीनगर ( वृत्तसंस्था ) – जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ झालेल्या स्फोटात लष्कराचे दोन जवान शहीद झाले.
शनिवारी राजौरी जिल्ह्यात अग्रीम चौकीजवळ पेट्रोलिंगदरम्यान झालेल्या स्फोटात दोन लष्करी जवान शहीद झाले. भारतीय लष्कराने सांगितले की, नौशेरा सेक्टरमध्ये लष्कराचे पथक पेट्रोलिंग करत होते, त्याचवेळी नियंत्रण रेषेजवळ हा स्फोट झाला. या स्फोटात एक लष्करी अधिकारी आणि एक जवान गंभीर जखमी झाले. दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
शहीद लेफ्टनंट ऋषी कुमार आणि शिपाई मनजीत सिंग यांनी कर्तव्य बजावताना देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं आहे. लष्कराच्या व्हाईट नाइट कॉर्प्सने सांगितलं की, “नौशेरा सेक्टरमध्ये पेट्रोलिंग करत असताना माइन स्फोट झाला. या स्फोटात आणखी एक जवान जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. लेफ्टनंट ऋषी कुमार हे बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातील रहिवासी होते. शिपाई मनजीत सिंग हे पंजाबमधील भटिंडा येथील रहिवासी होते.
याआधी, जम्मू-काश्मीरच्या पुंछ आणि राजौरी या दोन सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मोठ्या शोध मोहिमेदरम्यान 9 जवान शहीद झाले होते. पूंछच्या सुरनकोट जंगलात कारवाईच्या पहिल्याच दिवशी लष्कराचे पाच जवान शहीद झाले होते, तर 14 ऑक्टोबरला मेंढरच्या भट्टी दरियान भागात चार जवान शहीद झाले होते.