अमळनेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील जळोद गावालगत झालेल्या दोन वाहनांच्या भीषण अपघातप्रकरणी दोन्ही चालकांविरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संदेश रामधन पाटील यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १३ जुलै रोजी अमळनेर-चोपडा रस्त्यावर जळोद गावाजवळ प्रवासी मजूर वाहतूक करणारी अॅपे रिक्षा (एमएच-१९ बीजे-४३६५) आणि महिंद्रा व्हॅन (एमएच-१९ सीझेड-२५२२) यांचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात चोपडा तालुक्यातील बुधगाव येथील १५ पेक्षा अधिक महिला मजूर जखमी झाल्या होत्या. त्या मजुर महिला अमळनेर तालुक्यातील नंदगाव येथे मजुरीसाठी जात असताना ही दुर्घटना घडली.
दरम्यान, महिंद्रा व्हॅन चालक पवन बाविस्कर (रा. चुंचाळे, ता. चोपडा) हे आपल्या आई, पत्नी, मुलगा व मुलगी यांना घेऊन अमळनेरहून चोपड्याकडे जात असताना दोन्ही वाहनांचा समोरासमोर अपघात झाला. या घटनेत रिक्षाचालक योगेश कोळी आणि अनेक महिला मजूर गंभीररित्या जखमी झाले होते, तर बाविस्कर यांच्या पत्नीला देखील गंभीर दुखापत झाली होती.
घटनेचा पंचनामा व साक्षीदारांच्या जबाबांनंतर पोलिसांनी प्राथमिक चौकशीत असे निष्पन्न केले की, अॅपे रिक्षामध्ये प्रवासी क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविण्यात आले होते. तसेच महिंद्रा वाहनचालकाने रस्त्यावरच्या खड्ड्यांचा अंदाज न घेता भरधाव वेगाने वाहन चालवल्यामुळेच हा अपघात झाला. त्यावरून अमळनेर पोलिसांनी दोन्ही वाहनचालकांविरुद्ध निष्काळजीपणाने वाहन चालविल्याबद्दल गुन्हा दाखल केला असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत.









