जळगाव तालुक्यातील जळके येथे सराफी दुकान फोडले
जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील जळके येथील कृष्णा ज्वेलर्स हे सराफी दुकान फोडून आता चोरटयांनी ग्रामीण भागात आपला मोर्चा वळविल्याचे दिसून आले आहे. दुकानातील लोखंडी तिजोरी, २४०० ग्राम चांदी, १० हजार रोख व १० हजाराचा सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील चोरून नेला आहे. प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज प्रकाश पाटील (वय ३५, रा. नेरी बु ता. जामनेर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा शेती व्यवसाय व जळके ता. जि. जळगांव येथे कृष्णा ज्वेलर्स नावाचे सोने चांदी खरेदी विक्री दुकान आहे. दुकानावर रविद्र साकरे रा वसतवाडी हा काम करतो. रविवारी दि. ११ रोजी सध्याकाळी ५. ३० वा. नेहमीप्रमाणे ते दुकानाचे शटर, चॅनल गेट असे दोघाना कुलूप लावून घरी निघून गेले होते. शनिवारी दि. १२ रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास वसंतवाडी येथील सरपंच विनोद शिवाजी पाटील यांनी त्यांना दुकान फोडले असल्याची माहिती दिली.
फिर्यादी मनोज पाटील हे तातडीने घरून आले असता, दुकानाचे शटरचे लॉक तोडलेले व शटरचे पट्ट्या वाकवल्या होत्या. दुकानात लावलेली लोखंडी तिजोरीचे काउंटर तुटलेले दिसले व लोखंडी तिजोरी काढलेली दिसली. तसेच पैसे ठेवलेला ड्रॉवर उघडलेला दिसला. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली. कोणीतरी अज्ञात इसमानी दुकानात शिरून दुकानातील चांदी व रोख रक्कम चोरून नेल्याचे दिसून आले. एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असून पोलीस तपास करीत आहेत.