महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार
मुंबई ( वृत्तसेवा) – जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील मौजे हिंगोणे येथील २०.०० हेक्टर शासकीय जमीन ‘भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेड’, नवी दिल्ली यांना प्रदान करण्यास राज्य शासनाने पूर्वपरवानगी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, यामुळे या भागात केळी ( टिश्यू कल्चर) रोपे उत्पादनाचा मोठा शेतीपूरक प्रकल्प साकारला जाणार आहे.

गट नंबर २२४ मधील ही जमीन प्रचलित बाजारमूल्य दरपत्रकानुसार किंमत वसूल करून ‘भोगवटादार वर्ग-२’ या धारणाधिकाराने प्रदान केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी जमिनीचा वापर केवळ केळी टिश्यू कल्चर रोपे उत्पादनासाठीच करणे बंधनकारक राहील. जमिनीचा ताबा मिळाल्यापासून पाच वर्षांच्या आत प्रकल्पाचे काम सुरू करावे लागेल. जमिनीखालील सर्व खाणी व खनिजांचे अधिकार शासनाकडे राखीव राहतील. नियोजन प्राधिकरणाच्या मान्यतेनेच या ठिकाणी बांधकाम करणे अनिवार्य असेल. जमिनीवर काही अतिक्रमण असल्यास ते हटवण्याची जबाबदारी संबंधित समितीची असेल.
नाशिक विभागीय आयुक्त आणि जळगाव जिल्हाधिकारी यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार वित्त विभागाने याला सहमती दर्शविली आहे. जिल्हाधिकारी जळगाव यांना पुढील आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेत नगर रचना विभाग आणि इतर संबंधित विभागांची ना हरकत प्रमाणपत्रे घेणे समितीवर बंधनकारक असणार आहे.
“राज्यातील शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी फडणवीस सरकार कटिबद्ध आहे. जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना या टिश्यू कल्चर प्रकल्पामुळे दर्जेदार रोपे उपलब्ध होतील, ज्यामुळे उत्पादकता वाढण्यास मदत होईल. हा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा, यासाठी सर्व अटी व शर्तींचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.”
– चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री








