अवघ्या १५ दिवसांपूर्वीच रुजू झाला होता इंटर्नशिपला
जळगाव (प्रतिनिधी):- जिल्ह्यातील पाळधी ता. जामनेर येथील एक उच्चशिक्षित तरुण चेन्नई येथील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी गेला असता, लाटांच्या तडाख्यात सापडून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जय नरेंद्र पाटील (२१) असे या बेपत्ता तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण पाळधी गावावर शोककळा पसरली आहे.

जय पाटील हा अभियांत्रिकी पदवीधर असून त्याची निवड चेन्नई येथील ‘कॉग्निझंट’या नामांकित कंपनीत इंटर्नशिपसाठी झाली होती. ५ फेब्रुवारी रोजी तो कामावर रुजू झाला होता. शनिवारी सुटी असल्याने जय आपल्या काही मित्रांसोबत चेन्नईतील समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेला होता. समुद्रकिनाऱ्यावर फिरत असताना अचानक आलेल्या मोठ्या लाटांनी तीन तरुणांना ओढून नेले. यात जयचा देखील समावेश आहे. शनिवारी सकाळी जयने पाळधी येथील आपल्या घरी फोन केला होता.
“आज सुटी आहे, त्यामुळे मित्रांसोबत फिरायला जात आहे,” असे त्याने घरच्यांना सांगितले होते. मात्र, त्यानंतर काही वेळातच त्याचा संपर्क तुटला. सायंकाळी चेन्नई पोलिसांनी जयच्या वडिलांना फोन करून या भीषण दुर्घटनेची माहिती दिली. वडील शेतकरी असून आई शिक्षिका आहे. जयच्या बहिणीचे सध्या बारावीचे पेपर सुरू असल्याने कुटुंब दुहेरी चिंतेत आहे.
या घटनेची माहिती मिळताच राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी तत्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणाची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी तामिळनाडू सरकारशी संपर्क साधून बचावकार्याबाबत माहिती घेतली असून, शोधकार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. जयचे काही नातेवाईक तातडीने चेन्नईला रवाना झाले आहेत.









