जळगाव ( प्रतिनिधी ) – शनीपेठ परिसरातील दिनकरनगरातील मोहन टॉकीजजवळच्या रहिवाशी असलेल्या २८ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. सोमवारी पहाटे ही घटना त्याच्या पत्नीच्या लक्षात आली. नरेश ऊर्फ बाळा रवींद्र सपकाळे असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
या मयत तरुणाचे मावस भाऊ नगरसेवक किशोर बाविस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनकरनगरातील मोहन टॉकीजजवळ नरेश सपकाळे हा तरुण परिवारासह राहतो. त्याचे स्वतःचे ट्रॅक्टर असून तो त्या ठिकाणीच काम करून परिवाराचा उदरनिर्वाह भागवतो. रविवारीच त्याचा पगार झालेला होता.
रात्री नेहमीप्रमाणे जेवण केल्यानंतर घराशेजारच्या पार्टिशनच्या खोलीत तो झोपायला गेला होता. सकाळी पाचच्या सुमारास पत्नी लक्ष्मी यांनी उठून पाहिले असता नरेश याने गळफास घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह आणला मयताच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी असा परिवार आहे.







