एस टी कर्मचाऱ्यांची भूमिका उद्या जाहीर करू – सदाभाऊ खोत
जळगाव ( प्रतिनिधी ) – एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने जी अंतरिम वेतनवाढ देऊ केली आहे त्यावर जळगावातील एस टी कर्मचारीही समाधानी नाहीत आम्ही जळगावात तरी बसेस बाहेर काढणार नाहीत अशी भूमिका त्यांनी घेतली आहे .
कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी यशोदा पांढरे यांनी सांगितले की आमचे पोट दुखतंय आणि सरकार डोकेदुखीच्या गोळ्या देत आहे , असा हा प्रकार आहे . विलीनीकरणाच्या मागणीवर आम्ही काहीही तडजोड करणार नाही . सरकारने प्रामाणिक इच्छा असेल तर अँड गुणरत्न सदावर्ते आणि कनिष्ठ कर्मचारी संघटनेचे अजय गुजर यांच्याशी चर्चा करावी , तसे होत नाहीय . आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत राजकीय नेते आहेत त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे मात्र आमच्या वतीने निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही त्यांना दिलेला नाही , हे सरकारच्या लक्षात कसे येत नाही ? आमच्या प्रमुख मागणीमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडेल असे सांगितले जात असले तरी आम्हाला त्याच्याशी देणेघेणे नाही . मंत्र्यांचे पगार वाढवताना सरकारच्या तिजोरीवर भार पडत नाही का ? आम्ही आमच्या रक्ताने , घामाने एस टी चालवतो . आम्ही फक्त खाकी ड्रेसमधील चालक आणि वाहकांना व निळ्या ड्रेसमधील यांत्रिक कर्मचाऱ्यांना ओळखतो , बाकी कुणाला ओळखत नाही हे सरकारने समजून घ्यावे , असेही त्या म्हणाल्या .
राज्य सरकारने जी अंतरिम वेतनवाढ देऊ केली आहे त्यावर आज रात्रभर सर्व कर्मचारी प्रतिनिधींशी चर्चा करू आणि हा संप मागे घ्यावा की नाही याचा निर्णय उद्या जाहीर करू असे आमदार सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे .
परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबतच्या पत्रपरिषद संपल्यानंतर आझाद मैदानावर आल्यावर सदाभाऊ खोत यांनी ही माहिती दिली . ते म्हणाले की या तात्पुरत्या पगारवाढीच्या प्रस्तावावर आम्ही सर्व साधकबाधक चर्चा करू आम्ही आता संपकरी कर्मचाऱ्यांना सरकारचा प्रस्ताव सविस्तर सांगणार आहोत . आझाद मैदानावर आल्यावर संपकरी कर्मचारी संप मागे घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचे लक्षात आल्यावर सदाभाऊ खोत यांनी ही भूमिका घेतली . एस टी कर्मचाऱ्यांमध्ये फसवणुकीची भावना वाढली आहे .