जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील आदर्शनगरातील रहिवाशी व्यापाऱ्याने घरातील छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आले .
आदर्शनगरातील समाधान गोल्डसीटी या गृहसंकुलातील चौथ्या मजल्यावर रहिवाशी असलेले विष्णू सच्चानंद आहुजा ( वय ३८ ) काल नेहमीप्रमाणे त्यांच्या सदनिकेत शयनकक्षात झोपले होते . आज सकाळी बराच वेळ झाला तरी त्यांना जाग कशी आली नाही म्हणून कुटुंबीयांनी दरवाजा ठोठावला परंतु ते दरवाजा उघडत नव्हते . त्यांनतर तो दरवाजा तोडून उघडला तेंव्हा त्यांनी छताच्या पंख्याला गळफास घेतलेला आढळून आला . जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या खबरीवरून एम आय डी सी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
विष्णू आहुजा यांचे बळीराम पेठेत रेडिमेड कपड्यांचे दुकान आहे . त्यांच्या पश्चात आई , पत्नी , १ मुलगा , १ मुलगी , भाऊ असा परिवार आहे . विष्णू आहुजा यांच्या आत्महत्येचे कारण मात्र लगेच समजू शकले नाही .