खोटे नगरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी):- शहरातील खोटे नगर भागात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या मुलाच्या निधनामुळे नैराश्यात असलेल्या प्रभाकर लक्ष्मणराव देशमुख (वय ६७) यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना शुक्रवारी, ६ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली.


प्रभाकर देशमुख हे आपल्या पत्नीसह खोटे नगर परिसरात वास्तव्यास होते. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांपूर्वी त्यांच्या मुलाचे आकस्मिक निधन झाले होते, ज्याचा त्यांना मोठा धक्का बसला होता. तेव्हापासून ते प्रचंड नैराश्यात होते. त्यातच गेल्या काही दिवसांपासून ते आजारीदेखील होते. मुलाच्या विरहाचे दुःख आणि आजारपणामुळे आलेल्या वैफल्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.
शुक्रवारी सकाळी त्यांच्या पत्नीच्या ही घटना लक्षात येताच त्यांनी एकच आक्रोश केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आला, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
प्रभाकर देशमुख यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि जावई असा परिवार आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.









