बळीराम पेठेत दोघे जखमी
जळगाव (प्रतिनिधी):- संजय दत्तच्या गाजलेल्या ‘वास्तव’ सिनेमात ज्याप्रमाणे वडापावच्या गाडीवर किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून गुन्हेगारीचा थरार सुरू होतो, तसाच काहीसा प्रत्यय जळगावकरांना आला आहे. बळीराम पेठेतील एका प्रसिद्ध वडापावच्या दुकानासमोर मित्रांसोबत उभ्या असलेल्या तरुणांवर ‘३जी गणेश’ नामक तरुणाने धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

भरवस्तीत सिनेस्टाईल राडा फिर्यादी लोकेश प्रमोद सपके (वय २३, रा. मारुती पेठ) हे ३० डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास आपल्या मित्रांसह बळीराम पेठेतील ‘सोनू वडापाव’ केंद्राजवळ उभे होते. यावेळी तिथे आलेल्या आरोपी ‘३जी गणेश’ याने विनाकारण शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत होताच आरोपीने दुकानातील लोखंडी झाऱ्याने आणि स्वतःजवळील धारदार शस्त्राने लोकेश आणि त्याचा मित्र कुणाल बाविस्कर यांच्यावर सपासप वार केले.
सिनेमातील ‘रघू’ची आठवण ‘वास्तव’ सिनेमातील सुरुवातीच्या दृश्यात ज्याप्रमाणे क्षुल्लक वादातून शस्त्रांचा वापर होतो, तसाच प्रकार इथे पाहायला मिळाला. भरवस्तीत आणि लोकांच्या गर्दीत झालेल्या या हल्ल्यामुळे आणि आरोपीच्या ‘३जी गणेश’ या नावामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. हल्ल्यानंतर “तुम्हाला जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देऊन आरोपी पसार झाला. या भीषण हल्ल्यात लोकेश आणि कुणाल हे दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार इंदल जाधव या प्रकरणाचा तपास करत असून, फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली जात आहे. शहराच्या मध्यवस्तीत घडलेल्या या घटनेने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.









