जळगाव(प्रतिनिधी )- शहरात मध्यरात्री एक अत्यंत खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. असोदा रस्त्यावरील तानाजी मालुसरे नगरात राहणारा ३० वर्षीय तरुण हर्षल प्रदीप भावसार याचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेमागे केवळ अपघात नसून, रात्री झालेल्या वादानंतर त्याचा घातपात झाला असावा, अशी भीती आणि चर्चा शहरात जोर धरू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत हर्षल भावसार हा तरुण मजुरी करून आपल्या आई-वडिलांसह कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याचा दुर्दैवी अंत मध्यरात्रीच्या सुमारास झाला.
जळगाव रेल्वे स्टेशन अधिकारी राजेश पालरेचा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री सुमारे १२ वाजेच्या दरम्यान, रेल्वे खांबा क्रमांक ४३३/१४ अ ते ४३३/१६/ अ या दरम्यान एका ३० वर्षीय तरुणाचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाल्याची माहिती मालगाडीच्या लोको पायलट यांनी स्टेशनला दिली. रात्री २ वाजता ही घटना अधिकृतपणे उघडकीस आली.
घातपाताची चर्चा का?
तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अनंत अहिरे आणि हवालदार प्रकाश चिंचोरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवला. परंतु, घटनास्थळ आणि परिसरातील माहितीनुसार, मृत्यू होण्यापूर्वी रात्री हर्षलचा काही तरुणांशी जोरदार वाद झाला होता. या वादानंतरच हा अपघात घडला की, वादातूनच त्याचा घातपात करून मृतदेह रेल्वे ट्रॅकवर फेकला गेला, अशा चर्चांना शहरात उधाण आले आहे. पोलीस या घटनेचा अपघात म्हणून नव्हे, तर घातपात झाल्याच्या दिशेनेही कसून तपास करत आहेत. हर्षलचा नेमका कोणाशी आणि कशावरून वाद झाला होता, याची चौकशी केली जात असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल.









