पश्चिम बंगालच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी):- शहराची सुवर्णनगरी अशी ओळख असली तरी, याच सुवर्णनगरीत सराफ बाजाराशी संबंधित फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका सोनाराचा विश्वास संपादन करून, तब्बल ३१ लाख ६९ हजार रुपयांचे सोने घेऊन दोन कारागीर फरार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

फिर्यादी तोटन बलराम मायती (वय ५१, रा. मातोश्री बिल्डिंग, जोशी पेठ, जळगाव) हे सोनारकाम करतात. त्यांच्याकडे पश्चिम बंगालमधील दोन कारागीर कामाला होते. ४ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास, आरोपी असित गंगाबाला मन्ना आणि तापस रूपचंद मन्ना (दोन्ही रा. बंशकल, पश्चिम मेदिनीपूर, पश्चिम बंगाल) यांनी फिर्यादी तोटन मायती यांचा विश्वास संपादन केला. मंगळसूत्र बनवण्यासाठी फिर्यादीने या दोघांना २० कॅरेट शुद्धतेचे एकूण २९७.१०० ग्रॅम सोने दिले होते. मात्र, हे सोने दागिने बनवण्यासाठी घेऊन गेलेले दोन्ही आरोपी फिर्यादीला कोणताही पत्ता न देता आणि सोने परत न करता जळगावातून फरार झाले आहेत.
३१ लाखांची फसवणूक चोरून नेलेल्या सोन्याची बाजारभावानुसार एकूण किंमत ३१,६९,४१२ रुपये इतकी आहे. अनेक दिवस शोध घेऊनही आरोपींचा पत्ता न लागल्याने अखेर ३१ डिसेंबर रोजी फिर्यादीने शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस कारवाई याप्रकरणी शनिपेठ पोलिसांनी आरोपी असित मन्ना आणि तापस मन्ना यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जळगाव शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक साजीद मन्सूरी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे पथक पश्चिम बंगालला जाण्याची शक्यता आहे.








