आमदार राजूमामा भोळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
जळगाव (प्रतिनिधी) : शहरात पशु चिकित्सा रुग्णालय व पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात यावे, अशी ठोस मागणी आ. राजूमामा भोळे यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे. ही मागणी त्यांनी शुक्रवारी, ११ एप्रिल रोजी केली.
भारत हा कृषिप्रधान देश असून, जगातील सर्वाधिक पशुधन भारताकडे आहे. त्यातच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यांत पशुपालनाला मोठा आधार आहे. या पार्श्वभूमीवर पशुवैद्यकीय शिक्षण व संशोधनाला चालना देणे, ही काळाची गरज असल्याचे आ. भोळे यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे. कृषी व दुग्ध व्यवसायात भारत आघाडीवर असून, ग्रामीण भागात पशुपालन ही महत्त्वाची उपजीविका ठरते. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या क्षेत्रात शिक्षणाची संधी मिळावी, त्यातून त्यांना रोजगाराच्या व नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने आ. भोळे यांनी महाविद्यालय स्थापनेची मागणी केली आहे.
या महाविद्यालयासाठी जळगाव शहरात योग्य जागा उपलब्ध करून देणे, आवश्यक निधी मंजूर करणे, तसेच प्रस्तावास लवकर मंजुरी मिळावी, यासाठी आमदार भोळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे अधिकृत पत्राद्वारे मागणी केली आहे. जळगावसारख्या जिल्ह्यात पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन झाल्यास स्थानिक तरुणांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधनाचे क्षेत्र आणि पशुसंवर्धनाच्या दिशेने ठोस पाऊल उचलता येईल, असा विश्वास आमदार भोळे यांनी व्यक्त केला आहे.