जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील कंजरवाडा परिसरात दुकानाचे कुलूप तोडून अडीच लाख रुपयाचे दागिने लंपास केल्याची घटना ३१ ऑक्टोबररोजी घडली होती. येथील साथीदारांच्या सहाय्याने घरफोडी करणाऱ्या चोरट्यास मध्यप्रदेशातून अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. भारतसिंग आयासिंग भाटिया (वय-१९) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.
संत चोखामेळा वस्तीगृहामागील नंदुरबारकर सराफ दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाख ४० हजाराचे दागिने चोरून नेले होते जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास सुरु असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ संजय हिवरकर यांना संशयित भारतसिंग भाटिया मध्यप्रदेशातील सतवास येथे असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना दिली.पो नि बकाले यांनी पथक तयार करून मध्यप्रदेशातील सतवास येथे रवाना केले. पथकाने सतवास पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने बुधवारी पहाटे सापळा रचून संशयित भारतसिंग भाटिया (वय-१९, रा. यात्रा मैदान, आत्माराम बाबा पाण्याच्या टाकीजवळ, सतवास, जि. देवास, मध्यप्रदेश) यास ताब्यात घेतले.
भारतसिंग भाटिया याला जळगावात आणल्यानंतर त्याने जळगावातील मोनुसिंग जगदीशसिंग बावरी व अन्य एका साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केल्यानंतर मोनुसिंग बावरी याच्या घरी जाऊन दागिन्यांचे समान हिस्से करून वाटप करून घेतल्याचे व त्याच्या हिस्स्यावर आलेले दागिने सतवास येथे लपवून ठेवल्याची कबुलीही त्याने पोलिसांना दिली आहे. भारतसिंग हा मध्यप्रदेशातील हिस्ट्रीशिटर गुन्हेगार आयासिंग भाटिया याचा मुलगा असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पो उ नि सुधाकर लहारे, स फौ रवी नरवाडे, पो हे कॉ संजय हिवरकर, राजेश मेढे, पोलीस नाईक , संतोष मायकल, चालक मुरलीधर बारी आदींनी ही कारवाई केली.