आव्हाणेशिवार लगत सत्यम पार्क येथे घटना
जळगाव (प्रतिनिधी):- शहरालगतच्या आव्हाणे शिवार भागातील सत्यम पार्कमध्ये बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ४७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फिर्यादी सागर राजेंद्र जगताप (वय ३२) हे दि. २० मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. दरम्यान, दि. २१ मार्चच्या सकाळी ७ वाजेच्या सुमारास ही घरफोडी झाल्याचे लक्षात आले. अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटातील मुद्देमाल लंपास केला.
चोरट्यांनी एकूण १,४७,००० रुपयांचा मुद्देमाल चोरला आहे.या घटनेबाबत सागर जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शशिकांत श्रीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शामकुमार मोरे पुढील तपास करीत आहेत. भरदिवसा झालेल्या या घरफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.









