जळगाव शहरातील पिंप्राळ्यातील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरांमधील पिंप्राळा बाजार परिसर रविवारी दुपारी दरोड्याच्या घटनेने खळबळ उडाली. पिंप्राळा येथील ‘साई अलंकार’ या सोन्या-चांदीच्या दुकानात शिरून तीन संशयितांनी दुकानदार आणि त्यांच्या मुलाला बेदम मारहाण केली. यानंतर काउंटरमधील रोकड आणि चांदीचे दागिने असा एकूण २३ हजार रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना घडली आहे.

भगवान हरी विसपुते (वय ७०, रा. दांडेकर नगर, पिंप्राळा) यांचे पिंप्राळा भागातील ओम शांती नगरमध्ये ‘साई अलंकार’ नावाचे सोन्याचे दुकान आहे. रविवारी ४ जानेवारी रोजी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास भगवान विसपुते आणि त्यांचा मुलगा जसवीन हे दुकानात असताना ही घटना घडली.
संशयित आरोपी गोलू उर्फ नितेश जाधव, यश पाटील आणि विशाल पाटील (सर्व राहणार पिंप्राळा) हे दुकानात शिरले. त्यांनी विसपुते पिता-पुत्राला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपींनी काउंटरचा ड्रॉवर ओढून त्यातील ८,००० रुपयांची रोकड (५०० च्या नोटा) आणि दुकानातील १५,००० रुपये किमतीच्या १०० ग्रॅम चांदीच्या वस्तू (ज्यात जोडवे, कडे, पायातील साखळ्या, वाळे आणि अंगठ्यांचा समावेश होता) असा एकूण २३,००० रुपयांचा माल बळजबरीने हिसकावून नेला.
याप्रकरणी ५ जानेवारी रोजी रात्री ७:४३ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांनी रात्री घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे तपास करीत आहेत.









