‘गेट टुगेदर’हून परतलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत आणि चैन हिसकावली
जळगाव (प्रतिनिधी ) – ‘गेट टुगेदर’ कार्यक्रमावरून घरी परतलेल्या एका महिलेला लुटल्याची घटना जळगावातील अयोध्या नगर परिसरात घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी अनिता अरुण ढाके (वय ४८, रा. अयोध्या नगर) यांच्या गळ्यातील ८ ग्रॅमची सोनपोत आणि १० ग्रॅमची सोन्याची चैन हिसकावून पोबारा केला. अंदाजे ९०,००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. ही घटना १६ नोव्हेंबर रोजी अयोध्या नगरातील संजीवनी अपार्टमेंटजवळ घडली.
अनिता ढाके या काशीबाई कोल्हे शाळेतील एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. कार्यक्रमानंतर त्या मैत्रिणींना भेटून घरी परतल्या.रात्रीच्या वेळी त्या संजीवनी अपार्टमेंटजवळ त्यांच्या घराजवळ दुचाकीवरून उतरत असताना, एका दुचाकीवर दोघे जण त्यांच्याजवळ आले.एका चोरट्याने काही अंतरावर दुचाकी थांबवली, तर दुसरा चोरटा अनिता ढाके यांच्याकडे पायी आला.
या चोरट्याने क्षणात त्यांच्या गळ्यातील सुमारे ४०,००० रुपये किमतीची ८ ग्रॅमची सोनपोत आणि ५०,००० रुपये किमतीची १० ग्रॅमची सोन्याची चैन ओढून हिसकावली.महिला आरडाओरड करेपर्यंत चोरट्यांनी दुचाकीवरून घटनास्थळावरून पळ काढला.
अनिता ढाके यांनी याप्रकरणी एमआयडीसी (MIDC) पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत.









