नवीपेठ भागातील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील गजबजलेल्या नवीपेठ परिसरातून एका रिक्षाचालकाची ४५ हजार रुपयांची रोकड असलेली पिशवी अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुसुंबा खुर्द येथील रहिवासी आणि व्यवसायने रिक्षाचालक असलेले शुभम प्रकाशचंद राठी (वय ३१) हे १३ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास नवीपेठ भागातील एथर शोरूमजवळ थांबले होते. यावेळी त्यांच्या जवळील निळ्या रंगाच्या कापडी पिशवीत एकूण ४५ हजार रुपयांची रोकड होती. अज्ञात चोरट्याने राठी यांची नजर चुकवून ही पिशवी लंपास केली. एकूण ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
या घटनेनंतर शुभम राठी यांनी १४ मार्च रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहराचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक शिरसाठ या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.









