जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात अतिदक्षता कक्षात उपचार सुरु
जळगाव ( प्रतिनिधी ) – दोघा भावांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मध्यस्थांवरच एका भावाने चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना आज कुसुंबा गावाजवळच्या तुळजाईनगरात घडली आहे.
फिर्यादी आकाश अरुण सोनार ( वय ३२ ) हे तुळजाईनगरात राहतात . त्याच भागातील रहिवाशी व किराणा दुकानाचे व्यापारी कमलेश जैन आणि पंकज जैन हे सख्खे भाऊ आहेत . त्यांच्या नातेवाईकांच्या घरी वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला जात असतांना, यापैकी मोठा भाऊ कमलेश जैन हा मद्यप्राशन करून येत होता म्हणून लहान भाऊ पंकज जैन याने मोठ्या भावाला तु तिथे कार्यक्रमाला येऊ नको सांगितले. त्यावरून या दोघा भावांचे भांडण सुरु होते. हे भांडण सोडवण्यासाठी तुळजाईनगरातील रहिवाशी आकाश सोनार मध्ये पडले होते. रागावलेल्या कमलेश जैन याने त्याचवेळी आकाश सोनार यांना चाकूने मारत त्यांच्या छातीवरील डाव्या बरगडीवर वार केला. या चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झालेले आकाश सोनार यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले आहे .
डॉक्टरांनी दिलेल्या खबरीवरून एमआयडीसी पोलिसांनी आकाश सोनार यांचा जबाब नोंदवला आहे . त्यांच्या फिर्यादीवरून एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु होते.