निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी):- महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या चारही बाजुला स्थिर सर्व्हेक्षण पथके तैनात करण्यात आली आहेत. त्यापैकी एका पथकाने ममुराबाद रस्त्यावरील चौकीवर मोठी कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान एका कारमधून सुमारे २९ लाखांची रोख रक्कम तसेच ८० ग्रॅम सोने आणि ३ किलो चांदी जप्त करण्यात आली आहे.

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत जळगाव जिल्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत संशयास्पद रोकड व सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे. बऱ्हाणपूरहून जळगावमधील सुवर्ण बाजारपेठेत हा मुद्देमाल आणला जात असल्याचे कारमधील तिघांनी सांगितले असले, तरी त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारच्या अधिकृत पावत्या नसल्याने पोलिसांचा संशय बळावला.
भरारी पथकाने नियमित तपासणीदरम्यान एका संशयास्पद कारला थांबवून झडती घेतली असता, कारमधून मोठ्या प्रमाणात रोकड तसेच सोन्या-चांदीचा मुद्देमाल आढळून आला. कारमधील तिघांनी हा मुद्देमाल बऱ्हाणपूर येथून जळगावातील सराफा व्यावसायिकांकडे पोहोचविण्यात येत असल्याचे सांगितले. मात्र, या व्यवहारासंदर्भातील कोणत्याही पावत्या, बिल किंवा अधिकृत कागदपत्रे त्यांच्याकडे नसल्याचे तपासात स्पष्ट झाले.
कारमध्ये बऱ्हाणपूर येथील राकेश दामोदरदास श्रॉफ, जयेश राकेश श्रॉफ आणि चालक नवीन भावसार हे तिघेच होते. स्थिर निरीक्षण पथकाने कार थांबवल्यानंतर आतील मुद्देमालाविषयी विचारणा केली. तेव्हा बऱ्हाणपूर येथून जळगावमध्ये सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी व नवीन दागिने खरेदी करण्यासाठी रोख रक्कम आणि सोने, चांदी घेऊन जात असल्याचे तिघांनी सांगितले. तसेच सर्व मुद्देमाल बऱ्हाणपूर येथील एका सुवर्ण पेढीचे मालक दामोदारदास गोपालदास श्रॉफ यांच्या मालकीचा असल्याचे स्पष्ट केले.









