जुने जळगावात रविवारी सकाळची घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरात रविवारी सकाळी अग्निशमन विभागाच्या जवानांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे विहिरीत पडलेल्या एका बकरीचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. जुने जळगाव परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरजवळ ही घटना घडली.


रविवार, १ फेब्रुवारी रोजी सकाळी जुने जळगाव भागातील एका विहिरीत बकरी पडल्याची घटना घडली. माजी नगरसेवक राजेश सोनवणे यांची कन्या प्रिया सोनवणे यांनी सकाळी ४:५५ वाजता या घटनेची माहिती जळगाव शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले.

मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने बचाव कार्य सुरू केले. विहिरीचा अंदाज घेत जवानांनी शिताफीने बकरीला सुखरूप आणि जिवंत बाहेर काढले. बकरी सुखरूप बाहेर निघाल्याने तिची मालकीण निर्मला सोनवणे आजीबाई यांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि अग्निशमन दलाचे आभार मानले.
बकरीला जीवदान देण्यात वाहन चालक देविदास सुरवाडे, फायरमन भूषण पाटील, वृषभ सुरवाडे, गिरीश खडके, चेतन सपकाळे, भावेश मराठे यांनी कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा होता. अग्निशमन दलाच्या या कामगिरीचे परिसरात कौतुक होत आहे.









