महासतीजी डॉ. सुप्रभाजी म.सा. आदिठाणा ६ यांच्यासह शोभायात्रेचे उत्साहात स्वागत
जळगाव (प्रतिनिधी) – जळगावच्या पवित्र भूमीवर श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रमण संघाने आयोजित केलेल्या ‘आत्मोत्कर्ष चातुर्मास २०२५’ या आध्यात्मिक महापर्वासाठी शुक्रवार, दि. ४ जुलै २०२५ रोजी सकाळी संयम स्वर्णसाधिका, श्रमणीसूर्या राजस्थान प्रवर्तिनी महासतीजी डॉ. श्री. सुप्रभाजी म.स. ‘सुधा’ आदी ठाणा ६ यांचा मंगल प्रवेश उत्साहात संपन्न झाला.
जळगावच्या चातुर्मास मंगल प्रवेश भव्य शोभायात्रेस काव्यरत्नावली चौकातील भाऊंच्या उद्यानापासून सकाळी झाली. महिलांनी लाल साडी आणि पुरुषांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. महिलांच्या डोक्यावर मंगल कलश, पुरुषाच्या हातात घोषवाक्य फलक होते. ‘जैनम जयति शासनम्,’ व भगवान महावीरांचा जयघोष करत ही शोभायात्रा आर.सी. बाफना स्वाध्याय भवन येथे विसर्जित झाली. यामध्ये महासतीजी डॉ. श्री. सुप्रभाजी म.सा. ‘सुधा’, महासती डॉ. श्री उदितप्रभाजी म.सा. ‘उषा’, महासती डॉ. श्री हेमप्रभाजी म.सा. ‘हिमांशू’ महासती डॉ. इमितप्रभाजी म.सा., महासती श्री. उन्नतीप्रभाजी म.सा., महासती श्री. निलेशप्रभाजी म.सा. आदी ठाणा ६ यांचा आहे. स्वाध्याय भवनात विशेष कार्यक्रमाची सुरूवात पवित्र नमोकार महामंत्राने झाली. सदाग्यान भक्ती मंडळ, स्वाध्याय महिला मंडळ आणि श्रमणसंघ महिला मंडळ यांनी स्वागतगीत व भजन सादर केले. संघपती दलिचंद जैन म्हणाले की, ‘धर्मनगरी जळगावचे श्रावक-श्राविकांनी चातुर्माससाठी आलेल्या सहा साध्वींपैकी चौघांनी डॉक्टरेट मिळविली आहे. ज्ञानवंत महासतीजींकडून धर्म आणि आध्यात्म याची सखोल माहिती घेऊन आत्मोत्कर्ष साधावा.’ असे आवाहन करण्यात आले.’जळगाव श्री संघात अनेकात एकता आहे. चातुर्मास काळात ज्ञानाची गंगा प्रवाहित होणार आहे. यातून अधिक एकता, सद्भावना आणि ज्ञान आचरणाची निश्चित वृद्धी होईल.’ असे मत ईश्वरलालजी जैन यांनी व्यक्त केले. कार्याध्यक्ष कस्तुरचंदजी बाफना यांनी जळगावमध्ये संपन्न झालेल्या ३७ चातुर्मास व साधु, साध्वीगणांच्या आठवणींना उजाळा दिला. या चातुर्मासात मिळालेल्या संधीचे सोने करूयात असे मनोगत व्यक्त केले.
महासतीजी डॉ. श्री. सुप्रभाजी म.सा., महासती डॉ. श्री हेमप्रभाजी म.सा.,महासती डॉ. श्री उदितप्रभाजी म.सा. यांनी उपस्थितांशी भावनिक होत संवाद साधला. जळगावकडे विहार करताना एका मराठी व्यक्तीने कोणत्या ठिकाणी जात आहात असा प्रश्न विचारला असता, जळगाव उत्तर ऐकून जळगाव म्हणजे, “सुईभर” जळगाव! क्षणभर वाटले की, येथे सुयांचा व्यवसाय असेल परंतु ही तर धर्मनगरी, केळीचे आगार, सुवर्ण नगरी आहे. सु म्हणजे सुरेशदादा, ई म्हणजे ईश्वरलालजी, भ म्हणजे भवरलालजी आणि र म्हणजे रतनलालजी या कर्तृत्वसंपन्न व्यक्तींमुळे जळगावचा लौकीक वाढविला असे डॉ. हेमप्रभाजी म.सा. म्हणाल्या. तर डॉ. उदितप्रभाजी म.सा. यांनी ‘४’ अंकाची महती सांगितली. आज चार तारीख आहे आज मंगल प्रवेश झाला त्यामुळे हा दिवस विशेष आहे. F म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी धर्माला, O म्हणजे ऑब्झरवेशन, U म्हणजे तन, मन, धन आणि वेळ यांची युटिलीटी आणि R म्हणजे रेग्युलर होणे. धार्मिक प्रवचन, शिबिरे, चर्चासत्र आणि परीक्षा स्वाध्यायभवनात होतील, त्यात आपण सर्व हिरीरीने सहभागी होऊयात.
चातुर्मास काळात आपल्या आत्म्याकडे आपले मुख असायला हवे. व्यक्तीची वयपरत्वे बघण्याची दृष्टी बदलत असते. बाल्यावस्थेत बाळाचे तोड आईकडे असते, तारुण्यात पत्नीकडे तर वृद्धापकाळात मुलगा, सुनेकडे तोंड असते. आपल्या आत्म्याच्या उत्कर्षासाठी भगवान महावीरांचा संदेश घेत आपल्या समोर आम्ही सहा प्रतिनिधी येथे आलेले आहेत. या काळात धर्म आराधना, त्याग, तपस्या, ध्यान, संयम साधना करून आपला आध्यात्मिक उत्कर्ष साधावा. ८ जुलै पासून ‘आत्मोत्कर्ष’ या संकल्पनेवर आधारीत प्रवचनमालेस आरंभ होणार आहे, असे आवाहन महासतीजी डॉ. श्री. सुप्रभाजी म.सा. यांनी केले. महामंत्री अनिल कोठारी यांनी सूत्रसंचलन तर ऋणनिर्देश आत्मोत्कर्ष चातुर्मास समिति प्रमुख श्रीमती ताराबाईजी डाकलीया यांनी केले. गुरुमहाराजांच्या विहार सेवेत गेल्या २५ वर्षांपासून असलेले जोरावर सिंग तसेच १५ वर्षांपासून असलेल्या दीपाबेन यांचा धर्मसभेत गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला.
संघपती दलीचंदजी जैन, ईश्वरलालजी जैन, अशोकभाऊ जैन, नयनतारा बाफना, प्रदीपजी रायसोनी, संघकार्याध्यक्ष कस्तुरचंदजी बाफना, सुशिलजी बाफना, सौ. ज्योती अशोक जैन, संघउपाध्यक्ष सुरेंद्रजी लुंकड, विजयकुमार कोटेचा, कांतीलाल कोठारी, महामंत्री अनिल कोठारी, मंत्री अजय राखेचा, स्वरुप लुंकड, दिलीप चोपडा, शांतीलाल बिनायक्या, अनिल देसर्डा, नंदलाल गादीया, अमर जैन, प्रविण पगारिया, किशोर भंडारी, प्रकाश बेदमुथा, तारादेवी रेदासनी, विजया मल्हारा, संध्या कांकरिया त्याचप्रमाणे चेन्नई येथून सुरेश बेदमुथा जे डॉ. उदितप्रभाजी म.सा. यांचे संसारी बंधु आणि हेमप्रभाजी म.सा. यांचे संसारी बंधु नवरतनमल चोरडिया यांच्यासह श्रमण संघाच्या सदस्यांचा, श्रावक श्राविकांचा उपस्थितांत प्रामुख्याने समावेश होता.