जळगाव ( प्रतिनिधी ) – जुने बसस्थानक परिसरात रविवारी दुपारी अंगावर मिरची पावडर टाकून तरुणावर मद्यपीने चाकू हल्ला केल्याने दादागिरी करणाऱ्या भुरट्यांची दहशत पुन्हा दिसून आली आहे
विक्की शशिकांत बोरसे (३५, रा. पिंप्राळा-हुडको) असे जखमी तरुणाचे नाव आहे . चाकूने हल्ला करणाऱ्या मद्यपीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंप्राळा – हुडको येथील विक्की बोरसे रविवारी जुने बसस्थानक परिसरात उभे होते. त्यावेळी एका मद्यपीने त्यांच्या खिशात हात टाकला. बोरसे यांनी त्या मद्यपीचा हात पकडला. परंतु, त्याने बोरसे यांच्या अंगावर मिरची पावडर टाकून चाकूने पायावर वार केला. पायाला गंभीर जखम झाल्यामुळे बोरसे यांनी मद्यपीचा हात सोडताच, तो तेथून पसार झाला. परंतु, पायातून रक्तस्त्राव होत असल्यामुळे बोरसे यांनी चुलत भाऊ व ओळखीच्या रिक्षाचालकाला बोलावले नंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांनंतर बोरसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मद्यपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.