एमआयडीसी पोलीस स्टेशनची कारवाई ; मुद्देमाल जप्त
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरात एमआयडीसी पोलिसांनी एका मोठ्या घरफोडीचा २४ तासांच्या आत छडा लावला आहे. नशेमन कॉलनीतील तन्वीर मजहर पटेल यांच्या घरातून चोरलेले २ लाख रुपये किमतीचे २ ॲपल आयफोन आणि १ वन प्लस मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.
तन्वीर पटेल यांच्या घरात अज्ञात चोरट्याने दि. १८ मे २०२५ रोजी मध्यरात्री २ ते ३ वाजण्याच्या सुमारास प्रवेश करून मोबाईल चोरले होते. या घटनेनंतर दि. १९ मे रोजी पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगाव जिल्ह्यात वाढत्या मालमत्तेच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी दिलेल्या निर्देशानुसार, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पो. नि. संदीप पाटील यांनी तात्काळ तपासाची सूत्रे हलवली.(केसीएन)डीबी पथकातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून, स्थानिक नागरिकांकडून माहिती गोळा केली, गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळवली आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी फिर्यादींच्या घराजवळ एक अल्पवयीन मुलगा फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे तपास पथकाने शहरातील विविध भागांमध्ये शोध घेऊन एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेले दोन्ही ॲपल आयफोन आणि वन प्लस मोबाईल असे एकूण २ लाख रुपये किमतीचे फोन २४ तासांच्या आत हस्तगत करण्यात आले.(केसीएन)या कामगिरीत एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या डीबी पथकातील पो. उ. नि. राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पो. हे. कॉ. रामकृष्ण पाटील, पो. कॉ. किरण पाटील, छगन तायडे, राहुल घेटे, नितीन ठाकुर, योगेश बारी आणि योगेश घुगे यांचा मोलाचा वाटा होता. या गुन्ह्याचा पुढील तपास पो. हे. कॉ. रामकृष्ण पाटील हे करत आहेत.