जळगाव महापालिकेचे जाहीर आवाहन
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांच्या वाढत्या घटनांची दखल घेत, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जळगाव शहर महानगरपालिकेने एक महत्त्वपूर्ण जाहीर निवेदन प्रसिद्ध केले आहे.

महापालिकेच्या हद्दीतील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे कोणाला दुखापत झाल्यास किंवा दुर्दैवी मृत्यू ओढवल्यास संबंधितांना आता रीतसर नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मा. उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिका क्र. ७१/२०२३ वर १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सुनावणी झाली होती. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिकेने हे पाऊल उचलले आहे. रस्ते सुस्थितीत ठेवणे ही पालिकेची जबाबदारी असून, त्यातील त्रुटींमुळे नागरिकांचे नुकसान झाल्यास त्यांना मोबदला देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
ज्या नागरिकांना खड्ड्यांमुळे अपघात झाला आहे किंवा ज्यांच्या नातेवाईकांचा यात बळी गेला आहे, त्यांनी खालील पत्त्यावर आपले अर्ज पुराव्यानिशी सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहर अभियंता कार्यालय, ९ वा मजला, सरदार वल्लभभाई पटेल महानगरपालिका प्रशासकीय इमारत, महात्मा गांधी रोड, जळगाव येथे पाठवावे
नागरिकांनी सादर केलेल्या अर्जांची छाननी करण्यासाठी मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक विशेष समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती प्राप्त अर्जांची आणि पुराव्यांची पडताळणी करेल. त्यानंतर योग्य ती कार्यवाही करून पात्र लाभार्थ्यांना नुकसान भरपाई (मोबदला) अदा करण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे. या निर्णयामुळे प्रशासनावर रस्ते दुरुस्तीसाठी दबाव वाढणार असून, पीडित नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.








