भुसावळच्या महिलेला मिळाले नवजीवन; डॉ. निलेश किनगेचे मानले नातेवाईकांनी आभार
जळगाव, (प्रतिनिधी) :- आचेगाव (तालुका भुसावळ) येथील रहिवासी श्रीमती अलका रविंद्र भोळे यांना अचानक डाव्या डोळ्याची पापणी पडून दिसण्यास त्रास सुरू झाला होता. महिनाभर अनेक ठिकाणी उपचार घेऊनही अचूक निदान न झाल्याने त्यांच्या प्रकृतीत फरक पडत नव्हता. अखेरीस त्यांनी जळगाव येथील डॉ. निलेश किनगे (ॲक्सॉन ब्रेन हॉस्पिटल, जळगाव) यांच्याकडे तपासणी करण्याचा निर्णय घेतला.
डॉ. किनगे यांनी श्रीमती भोळे यांची तपासणी करून मेंदूचा आणि मेंदूतील नसांचा एमआरआय (MRI) करण्याचा सल्ला दिला. या तपासणीत त्यांच्या मेंदूतील डोळ्यांना रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांपैकी एका वाहिनेतील असामान्य (Abnormal) फुगा फुटून रक्तस्राव झाल्याचे निदान झाले.
या दुर्मिळ व गुंतागुंतीच्या स्थितीवर अधिक स्पष्टतेसाठी डॉ. किनगे यांनी त्यांना रुग्णालयात दाखल होऊन मेंदूची ॲन्जिओग्राफी करण्याचा सल्ला दिला. ॲन्जिओग्राफीमध्ये मेंदूतील डाव्या बाजूच्या डोक्याच्या धमनीत मोठा फुगा (Left PCOM Aneurysm) असल्याचे स्पष्ट झाले.
हा फुगा मोठा असल्याने आणि त्याची ‘मान’ मोठी असल्याने, डॉ. निलेश किनगे यांनी प्रगत तंत्रज्ञान वापरून ‘फ्लो डायव्हटर’ (Flow Diverter) टाकण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जर्मन बनावटीचा ‘ब्लास्ट कंपनी’चा ‘सिल्क व्हिस्टा’ स्टेंट वापरून फुगा यशस्वीरित्या बंद केला. ही शस्त्रक्रिया अत्यंत अवघड मानली जाते आणि सहसा पुणे-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्येच उपलब्ध असते.
डॉ. निलेश किनगे यांनी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली. यासाठी त्यांना डॉ. विनोद किनगे (भूलतज्ञ), डॉ. वैजयंती किनगे (रेडिओलॉजिस्ट) आणि डॉ. संजीव हूजुरबाजार (न्यूरोसर्जन) यांचे सहकार्य लाभले. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या चार तासांत रुग्ण पूर्णपणे शुद्धीवर आले आणि आता त्यांची प्रकृती पूर्णपणे सुधारली आहे. डॉ. निलेश किनगे गेल्या दहा वर्षांपासून जळगाव शहरात अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या न्यूरोलॉजिकल शस्त्रक्रिया यशस्वीपणे करत आहेत.
डोक्याला मार लागणे, मेंदूत रक्तस्राव, लकवा (पॅरालिसिस), अचानक दिसणे बंद होणे, चक्कर येणे, वारंवार डोकेदुखी, अपघात किंवा कोणत्याही प्रकारच्या नसांसंदर्भातील (Neurological) त्रास जाणवल्यास दुर्लक्ष न करता तपासणी करून घेण्याचे आवाहन डॉ. निलेश किनगे यांनी केले.