भादली ते शेळगाव दरम्यानच्या पाटचारीत आढळला मृतदेह
जळगाव (प्रतिनिधी) कपाळावर धारदार शस्त्राने प्रहार करून गळा चिरून एका ३१ वर्षाच्या युवकाची निर्घृण हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी नागरिकांच्या लक्षात आला . भादली ते शेळगाव दरम्यान पुलानजीक असणाऱ्या पाटचारीत युवकाचा मृतदेह आढळून आला. . सौरभ यशवंत चौधरी (वय ३१, रा.दशरथ नगर, जळगाव) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी याबाबत नशिराबाद पोलिसांना खबर दिल्यावरून तात्काळ घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली.
यावेळी क्रुरपणे सौरभचा गळा चिरलेला तर कपाळावर घाव घालण्यात आलेले होते. दोन्ही हातांची त्वचा बाहेर आलेली होती. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, भुसावळ विभागाचे डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे, नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अनिल मोरे, उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे, सहायक फौजदार अलियार खान, हवालदार शिवदास चौधरी, रवींद्र तायडे, लिना लोखंडे व गणेश गायकवाड यांनी घटनास्थळी पाहणी केली असून तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यास सुरुवात केली आहे. घटनास्थळाचा पंचनामा करुन दुपारी तीन वाजता मृतदेह शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आला. दरम्यान, सौरभ याचा खून कोणी व कशासाठी केला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतू अत्यंत क्रुरपणे गळा चिरुन खून केल्यामुळे अनेक जण हादरून गेले आहेत.