चौघा मंत्र्यांकडून अपेक्षा; कारागृहाला वर्ग १ चा दर्जा नसल्याने अडचण ?
जळगाव (विशेष वृत्तांत) : खान्देशात मध्यवर्ती कारागृह नसल्याने व दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत जात असल्याने जळगावला मध्यवर्ती कारागृह असण्याची मागणी आता काळाची गरज बनली आहे. जळगाव कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक बंदी वाढले असल्याने कारागृह प्रशासनाला कारागृहाच्या व्यवस्थापनासाठी रोज तारांबळ करावी लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तिन्ही कॅबिनेट मंत्र्यांनी तसेच नवीन केंद्रीय राज्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमुखी मागणी करून जळगावला मोठे ७०० ते ८०० क्षमतेचे मध्यवर्ती कारागृह मंजूर करून अंमलात आणण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
जळगाव जिल्हा १५ तालुक्यांचा व क्षेत्रफळ संख्यादृष्टीने मोठा असतानाही शहरात वर्ग २ चे कारागृह आहे. तर शेजारील धुळे येथे तालुके ४ व नंदुरबार येथे तालुके ६ असतानाही तेथे वर्ग १ चे कारागृह आहे. त्यामुळे हा उलटा प्रकार प्रशासकीय क्षेत्रात सुरु आहे. जळगाव कारागृहात २०० बंद्यांची क्षमता आहे. मात्र आजच्या तारखेला २० महिला व ३९३ पुरुष असे ४१३ म्हणजेच दुप्पट बंदी कारागृहात आहेत. दि. ३ मे ते दि. १८ जून पर्यंत सत्र न्यायालयच्या परवानगीने आणि तत्कालीन डीआयजी यु. टी. पवार यांचे आदेशाने सर्व गुन्ह्यातील नवीन बंदी यांची नंदुरबार कारागृहात रवानगी केली आहे.
आता दि. १९ पासून जळगाव कारागृहात नवीन बंदी घेण्यास सुरुवात केली आहे. खान्देश विभागात मध्यवर्ती कारागृह नाही. भुसावळ, जळगाव, अमळनेर या ठिकाणी जिल्ह्यात ३ सत्र न्यायालय आहेत. जिल्ह्यात ३ कॅबिनेट, १ केंद्रीय राज्यमंत्री आहेत. त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय मांडला गेला पाहिजे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पाठपुरावा करून जळगाव येथे नक्कीच वर्ग १ चे मध्यवर्ती कारागृह निर्माण होणे शक्य आहे. तसेच हि काळाचीही गरज आहे. त्यामुळे याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
जळगाव हा मोठा जिल्हा असल्याने जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यामानाने संशयित आरोपीना ठेवायला जळगाव कारागृहाची क्षमता तोकडी आहे. यासाठी जिल्ह्याला मध्यवर्ती दर्जाची कारागृह असणे आवश्यक आहे. यासाठी सध्या प्रशासन सकारात्मक नाही. त्यांची मानसिकता देखील उदासीन आहे. आता जळगाव कारागृहात कोठडीचे बांधकाम सुरु आहे. त्यात २ बराकी तयार होतील. पुढील आठवड्यात बांधकाम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.