निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी टोळ्यांना पोलिसांचा सक्त इशारा; ‘तडीपारी’चा प्रस्ताव
जळगाव (प्रतिनिधी):- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील गुन्हेगारी टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी जळगाव पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. याच अनुषंगाने, आज शुक्रवारी भल्या पहाटे पोलिसांनी ‘महा-कॉम्बिंग ऑपरेशन’ राबवत शहरात खळबळ उडवून दिली.

या अभूतपूर्व कारवाईत, जळगाव शहर, एमआयडीसी, शनिपेठ आणि रामानंद नगर या चार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तब्बल १०४ रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले. या सर्व गुन्हेगारांना एकाच ठिकाणी हजर करून पोलिसांनी त्यांना कठोर शब्दात सक्त इशारा दिला आहे. ‘भविष्यात कोणत्याही गुन्हेगारी कृत्यात आढळल्यास थेट ‘तडीपारी’ कारवाईचा प्रस्ताव पाठवण्यात येईल,’ असे स्पष्टपणे बजावण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींवर ‘प्रिव्हेंटिव्ह’ (प्रतिबंधात्मक) कारवाई करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार, आज पहाटेच्या अंधारात या ‘महा-कॉम्बिंग ऑपरेशन’ची यशस्वी आखणी करण्यात आली.
या व्यापक मोहिमेत उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक बबन आव्हाड, रामानंद नगरचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, शनिपेठ पोलीस स्टेशनच्या निरीक्षक कावेरी कमलाकर आणि शहर पोलीस स्टेशनचे सुरेश आव्हाड हे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच, स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय आणि मोठा पोलीस फौजफाटा याकामी तैनात करण्यात आला होता.









