महिन्याभरात झाला दीड कोटींचा भरणा: २५ लाख रुपये माफ
जळगाव (प्रतिनिधी) :- दिनांक मार्चपर्यंत कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर थकबाकीदारांसाठी महावितरणने अभय योजना-२०२४ सुरु केली आहे. जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या जळगाव परिमंडलात योजनेला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. परिमंडलातील १३९१ ग्राहकांनी १.५७ कोटी रुपयांचा भरणा केला आहे. या योजनेमुळे १३९१ वीज ग्राहकांचे व्याज आणि विलंब आकारांचे एकूण २५.२६ लाख रूपये माफ झाले आहेत.
दिनांक १ सप्टेंबर रोजीपासून ही योजना सुरू झाली. मागील केवळ एक महिन्याच्या कालावधीत परिमंडलातील १३९१ ग्राहकांनी १.५७ कोटी रुपयांचा भरणा केला आहे. या योजनेमुळे १३९१ वीज ग्राहकांचे व्याज आणि विलंब आकारांचे एकूण २५.२६ लाख रूपये माफ झाले आहेत. कृषी व सार्वजनिक पुरवठा योजना वर्गवारीतील ग्राहक वगळून दिनांक ३१ मार्च पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असणाऱ्या सर्व लघुदाब आणि उच्चदाब वर्गवारीतील वीज ग्राहकांसाठी ही योजना आहे. योजनेत थकबाकीमुक्त होणाऱ्या खंडित ग्राहकांना नवीन वीज जोडणीची संधी देणारी ही योजना आहे.
योजनेनुसार पूर्ण मुद्दल भरणाऱ्या ग्राहकांना वीज बिलातील १०० टक्के व्याज व विलंब आकार माफ असणार आहे. महावितरणच्या या अभय योजनेमध्ये दिनांक १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर पर्यंतच सहभाग घेता येणार आहे. योजनेनुसार देय रकमेचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना १० टक्के तर उच्चदाब ग्राहकांना पाच टक्के सूट असणार आहे. एकरकमी अथवा एकूण वीजबिलाच्या ३० टक्के रक्कमेचा भरणा केल्यास नवीन जोडणी अथवा पुनर्जोडणी घेण्याची तत्काळ संधी उपलब्ध आहे. एकरकमी अथवा देय वीजबिलाचा ३० टक्के रक्कम भरून व्याजमुक्त सहा हप्ते भरण्याची सोयही योजनेत उपलब्ध आहे.
योजने नुसार केवळ एक महिन्यात जळगाव जिल्हयातून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असणाऱ्या ८२० ग्राहकांनी योजनेत १ कोटी २ लाख रुपयांचा एकरकमी वीजबिल भरणा केला आहे. धुळे जिल्ह्यातून ३९४ ग्राहकांनी ३५ लाख २४ हजार रुपयांचा तर नंदुरबार जिल्ह्यातून १७७ ग्राहकांनी १९ लाख ७२ हजार रुपयांचा एकरकमी वीजबिल भरणा केला आहे. जागेची मालकी, ताबेदार किंवा खरेदीदार यांच्यात बदल झाला असला तरी थकबाकीदारांना वीजबिलाच्या थकबाकीची रक्कम भरणे कायद्याने बंधनकारक आहे.
त्यामुळे थकबाकीदारांना थकबाकीमुक्त होण्यासाठी तसेच सदर जागेमध्ये नवीन वीज जोडणी घेण्यासाठी, ही योजना एक मोठी संधी आहे. थकीत ग्राहकांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात येत आहे. महावितरणच्या अभय योजनेत थकीत वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचे स्वागत करीत मुख्य अभियंता आय.ए.मुलाणी यांनी या योजनेच्या प्रभावी अमलबजावणीसाठी प्रयत्न केलेल्या महावितरण अभियंता, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचेही अभिनंदन केले.