जळगाव शहरातील मुंदडा नगरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील मुंदडा नगर भागात एका १३ वर्षीय शाळकरी मुलाचा सोमवारी सायंकाळी ४.४५ वाजता खेळता खेळता दोरीचा फास लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हार्दिक प्रदीपकुमार अहिरे (वय १३) असे या मुलाचे नाव आहे. हार्दिकचे वडील प्रदीपकुमार अहिरे हे रावेर तालुक्यातील केऱ्हाळा येथील माध्यमिक शाळेत शिक्षक आहेत, तर त्यांची आई गृहिणी आहेत. तो सातवी इयत्तेत शिकत होता. सोमवारी शाळेला अर्धी सुट्टी असल्याने हार्दिक दुपारी ३ वाजता घरी आला. जेवण झाल्यावर त्याने बाहेर खेळण्यासाठी आईकडे आग्रह धरला, मात्र पाऊस असल्यामुळे आईने त्याला बाहेर जाण्यास मनाई केली.(केसीएन)सायंकाळी ४.४५ च्या सुमारास हार्दिकची आई धाकटा मुलगा प्रसाद याला घेऊन बाहेर गेली असताना, हार्दिक घराशेजारील पद्मसिंह परदेशी यांच्या घरी खेळायला गेला. परदेशी यांच्या घराच्या पोर्चमध्ये प्रशिक्षणासाठी एक दोरी बांधलेली होती. हार्दिक त्याच दोरीजवळ खेळत असताना, त्याला अचानक त्या दोरीचा फास लागला आणि ही दुर्दैवी घटना घडली.
पद्मसिंह परदेशी यांच्या पत्नी घरात असताना, त्यांना अचानक आवाज ऐकू आला. त्या धावत आल्या असता, त्यांना हार्दिक दोरीला फास लागलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी तात्काळ हार्दिकच्या आईला बोलावले. घरातील सदस्यांनी तातडीने हार्दिकला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. त्यानंतर, हार्दिकचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.(केसीएन) या अनपेक्षित घटनेने अहिरे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.