जळगाव शहरातील दादावाडी पुलावर रुग्णवाहिकेला आग लागून सिलेंडरचा स्फोट
जळगाव (प्रतिनिधी) : एरंडोल ग्रामीण रुग्णालयातून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वर्ग केलेल्या रुग्णाला घेऊन जळगावला येत असलेल्या १०८ रुग्णवाहिकेला जळगाव शहरातील दादावाडी पुलाजवळ आले असताना अचानक आग लागली. चालकाने प्रसंगावधान राखून तातडीने स्वतःसह रुग्णवाहिकेतील माता, बाळ आणि डॉक्टर यांना सुखरूप बाहेर काढीत लांब नेले.काही वेळातच रुग्णवाहिकेतील सिलेंडरचा स्फोट झाला. चौघांचे थोडक्यात प्राण वाचल्यामुळे चालकाच्या समयसूचकतेचे कौतुक होत आहे. घटनेच्या वेळी दुतर्फा वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.
राहुल पाटील (वय ३० रा. साकरे ता. धरणगाव) असे रुग्णवाहिका चालकाचे नाव आहे. तो धरणगाव ग्रामीण रुग्णालयात १०८ रुग्णवाहिकेवर कार्यरत आहे.(केसीएन)दरम्यान, मनीषा रवींद्र भिल (वय २५, रा. बामणे ता. एरंडोल) ही गरोदर महिला त्रास होऊ लागल्याने जवळच्या जवखेडेसिम आरोग्य केंद्रात गेली होती. तेथेच तीची प्रसूती झाली. नंतर तिची प्रकृती खालावल्याने तिला एरंडोल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते.
एरंडोल ग्रामीण रुग्णालयात तपासणी करण्यात आल्यानंतर माता व बाळ यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वर्ग (रेफर) करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यासाठी धरणगाव येथील १०८ रुग्णवाहिका बोलवण्यात आली.(केसीएन)चालक राहुल पाटील हा रुग्णवाहिका क्रमांक (एमएच १४ सीएल ०७९१) ही घेऊन एरंडोल येथे आला. तेथून मनीषा भील व त्यांचे बाळ घेऊन डॉ. रफिक अन्सारी यांच्यासह राहुल पाटील याने रुग्णवाहिकेतून एरंडोल येथून जळगाव प्रवास सुरू केला.
दरम्यान, जळगाव शहरातील दादावाडी पुलावर रुग्णवाहिका आली असताना अचानक शॉर्ट सर्किटमुळे स्पार्कींग झाल्याचे राहुल पाटील याला लक्षात आले. त्याने तात्काळ पुलावर एका बाजूला रुग्णवाहिका थांबवली. खाली उतरून रुग्णवाहिकेतील डॉ. रफिक अन्सारी, रुग्ण मनीषा भिल व त्यांचे बाळ यांना बाहेर काढत लांबवर घेऊन गेला.(केसीएन)त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तेवढ्यात आगीने रुग्णवाहिकेचा पूर्ण ताबा घेतला होता. काही काळानंतर रुग्णवाहिकेतील सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. दरम्यान, जळगाव शहर महानगरपालिकेच्या दोन अग्निशामक बंबाने येऊन आग विझवली. मात्र तोवर रुग्णवाहिका पूर्ण खाक होऊन सांगाडा उरला होता. दरम्यान पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येत वाहतूक सुरळीत केली. घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती.