जळगाव (प्रतिनिधी) – परीक्षेत कॉपीमुक्त अभियान राबविण्याची जबाबदारी केंद्रसंचालकांची आहे. बारावी परीक्षेला सुरवात होण्यापूर्वी सर्व केंद्रसंचालकांना सूचना दिल्यांनतरही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कॉपी प्रकरणे दिसून येत आहे. केंद्रसंचालक व पर्यवेक्षक यांना कडक सूचना दिल्यानंतरही परीक्षेला कॉप्या होत असल्याने दहावी परीक्षेदरम्यान एकाच केंद्रावर पाचपेक्षा अधिक कॉपी प्रकरणे आढळ्यास केंद्रसंचालकांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा नाशिक विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव नितीन उपासनी यांनी दिला.
माध्यमिक राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिक विभागीय मंडळ यांच्यातर्फे दहावीच्या परीक्षेला दि.3 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी अण्णासाहेब डॉ. जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील केंद्रसंचालकांची बैठक घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी किशोर वायकोळे, मुख्याध्यापिका सी.एस. पाटील उपस्थित होत्या. जिल्ह्यात दहावीचे 134 केंद्र आहे. कॉपीमुक्त अभियान राबवण्याची जबाबदारी ही केंद्रसंचालकांची असल्याने सर्व केंद्रसंचालकांनी परीक्षेदरम्यान कोणतेही गैरप्रकार आपल्या केंद्रात होणार नाही याची दक्षता घ्यावी असे शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील यांनी सांगितले. बैठकीस जिल्ह्यातील केंद्रसंचालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण विस्तार अधिकारी किशोर वायकोळे यांनी केले.
बारावी परीक्षा सुरु झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर कॉपी प्रकरणे समोर येत असल्याने बैठकीमध्ये केंद्रसंचालकांना कडक शब्दात सूचना करण्यात आल्या आहे. यावेळी नितीन उपासनी यांनी सर्व केंद्रसंचालकांना विद्यार्थ्यांची गेटवरच तपासणी करा. कोणतीही कॉपी वर्गात जाता कामा नये. गैरमार्गाला आळाच घाला अशा शब्दात ताकीद दिली आहे.