ओबीसी महिला आरक्षण : महापौर पदासाठी आता उज्वला बेंडाळे, दीपमाला काळे प्रबळ दावेदार..!
जळगाव शहर महानगरपालिकेसाठी निघाले मुंबईत आरक्षण
जळगाव (प्रतिनिधी) येथील महानगरपालिकेची निवडणूक संपन्न झाल्यावर आता महापौर पदासाठी कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण निघते, याकडे लक्ष लागून होते. गुरुवारी दिनांक २२ जानेवारी रोजी सकाळी मंत्रालयामध्ये आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली. यात जळगावसाठी ओबीसी महिला या प्रवर्गातील महिलेला आता महापौर पदाची संधी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये जळगाव महापालिकेच्या १७ व्या महापौर म्हणून दीपमाला काळे आणि उज्ज्वला बेंडाळे यांच्यापैकी कोणाला पक्षश्रेष्ठी संधी देते हे पाहायला मिळणार आहे.
[
जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक ४६ जागांवर विजय मिळवण्यास शक्य झाले आहे. त्यामुळे आता त्यांचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेकडे केवळ २३ संख्याबळ असल्यामुळे महापौर पद हे भारतीय जनता पक्षाकडे राहणार आहे. यात आता ओबीसी महिला या प्रवर्गासाठी महापौर पदाचे आरक्षण निघाले आहे. ओबीसी महिला या प्रवर्गातून निवडणूक लढलेल्या भाजपच्या ५ महिला उमेदवार विजयी झालेले आहेत. यामध्ये मंडळ अध्यक्ष असलेल्या दीपमाला मनोज काळे, माजी महानगर जिल्हाध्यक्ष असलेल्या उज्वला मोहन बेंडाळे या जेष्ठ व अनुभवी महिला नगरसेवकांशिवाय पहिल्यांदाच निवडून आलेल्या माधुरी अतुल बारी, विद्या मुकुंद सोनवणे, कविता सागर पाटील हे पर्याय पक्षश्रेष्ठींकडे आहेत.

यामध्ये दीपमाला काळे आणि उज्वला बेंडाळे हे प्रबळ दावेदार आहेत. दीपमाला काळे या मंडळ अध्यक्ष आहेत. तसेच दीपमाला काळे आणि त्यांचे पती मनोज काळे अनेक वर्षांपासून भाजपचे सदस्य असून त्यांनी पक्षवाढीसाठी व संघटनेसाठी अनेक वर्षांपासून काम केलेले आहे. त्याचबरोबर उज्वला मोहन बेंडाळे यादेखील भाजपच्या अनेक वर्षांपासून सक्रिय सदस्य राहिलेले आहेत. तसेच नगरसेविका म्हणून त्या दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. महानगर जिल्हाध्यक्ष ही जबाबदारी देखील त्यांनी अत्यंत योग्यरीत्या पार पाडली आहे.
त्यामुळे या दोन्ही अनुभवी, जेष्ठ आणि निष्ठावंत महिला कार्यकर्त्यांची नावे आता आघाडीवर आहेत. त्याचबरोबर माजी नगरसेविका शोभा दिनकर बारी यांच्या सून तथा भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते अतुल बारी यांच्या पत्नी माधुरी अतुल बारी, मागील वेळी नगरसेवक राहिलेले मुकुंदा सोनवणे यांच्या पत्नी विद्या मुकुंदा सोनवणे, याशिवाय पिंप्राळा भागातून कविता सागर पाटील या प्रथमच निवडून आले आहेत, हे देखील पर्याय भाजपकडे आहेत. महापौर पदाचे नाव आज किंवा उद्या पक्षश्रेष्ठी घोषित करतील अशी माहिती भाजपच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

दुसरीकडे वरिष्ठांची मर्जी झाली, मंत्री गिरीश महाजन यांच्या पातळीवरून हालचाली झाल्या तर मग आमदार मंगेश चव्हाण यांचे निकटवर्तीय वैशाली अमित पाटील आणि रंजना विजय वानखेडे हे देखील महापौर पदाच्या शर्यतीत आहेत…








