सर्व पक्षांकडून एबी फॉर्म तयार करण्याची कार्यवाही सुरू
जळगाव ( विशेष प्रतिनिधी ) – जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता वरिष्ठांच्या आदेशाने महायुती मधील घटकांनी एकमत करून समीकरणे ठरवली आहे. यामध्ये तिन्ही पक्षांची आकडेवारी जुळली असून भाजप ४८, शिवसेना २२ आणि राष्ट्रवादी ५ असा फॉर्म्युला अंतिम झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

जळगाव शहर महानगरपालिकाचे निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याचा आता मंगळवारी दि. ३० हा शेवटचा दिवस आहे. या दिवशी सकाळी ९ वाजेपासून महानगरपालिकेला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त होणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीने त्यांचा जागा वाटपाचा फॉर्मुला अंतिम करून आघाडी घेतली असून महायुतीने अखेरपर्यंत ताणाताणी करून जागा वाटपाचा फॉर्मुला अंतिम केला आहे.
यामध्ये भारतीय जनता पक्षाला ४८, शिवसेनेला २२ आणि राष्ट्रवादीला ५ जागा या सोडण्यात आल्याचे खात्रीलायक माहिती प्राप्त झालेली आहे. भाजपच्या ४८ जागांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अनिल अडकमोल यांना प्रभाग १२ अ मधून उमेदवारी निश्चित झाली आहे. तर दुसरीकडे ज्यांची उमेदवारी अंतिम झाली आहे अशांचे एबी फॉर्म तयार करण्याची कार्यवाही सर्व पक्षांच्या कार्यालयामध्ये सोमवारी रात्रीपर्यंत सुरू आहे. अनेक कार्यकर्ते हे पक्ष कार्यालयामध्ये उभे असून ज्यांना तिकीट नाही त्यांनी अपक्ष अर्ज भरण्यासंदर्भात तयारी पूर्ण केलेली आहे.









