जळगाव जिल्ह्यातील सहा जणांचा समावेश
जळगाव (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीत कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या सहा कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने प्रत्येकी १५ लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले. पुढील काही दिवसात ही रक्कम मयत व्यक्तींच्या वारसांना मिळेल अशी माहिती मिळाली आहे.
शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी याबाबतचा अध्यादेश काढला आहे. ही रक्कम जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे लागलीच वितरीत करण्यात आली आहे. रावेर तालुका कृषी कार्यालयाचे कृषी सहायक डिगंबर निवृत्ती गाजरे, होमगार्ड संतोष बापुराव च-हाटे, लघू पाटबंधारे विभागाचे वाहन चालक मुरलीधर सोना भालेराव, महानगरपालिकेचे लिपिक संजय भगवान चौधरी, चोपडा पंचायत समितीचे कर्मचारी हिरामण ज्ञानेश्वर महाजन व रामदेववाडी येथील आशा सेविका वच्छलाबाई सरदार चव्हाण आदींचा निवडणूक कर्तव्यावर असतांना मृत्यू झाला होता. मयताच्या वारसांना मदती- साठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पाठविला होता. त्यानुसार मयतांच्या वारसांना ही मदत मिळणार आहे.