राज्याच्या ग्रामविकास विभागातर्फे पुरस्कारांची घोषणा
जळगाव (प्रतिनिधी) : ग्राम विकास विभागातील मंत्रालयातील व क्षेत्रिय स्तरावरील गुणवंत अधिकारी कर्मचारी पुरस्काराची घोषणा ग्रामविकास विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. यात धरणगाव पंचायत समितीचे आरोग्य सेवक मिलिंद मनोहर लोणारी यांची गुणवंत कर्मचारी म्हणून निवड करण्यात आली आहे.
आरोग्य सेवक मिलिंद मनोहर लोणारी यांना यापूर्वी महाराष्ट्र शासनाकडून राज्यस्तरीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. आरोग्य विभाग जिल्हा परिषद येथील सेवा कालावधीत मिलिंद लोणारी यांनी कार्यालयाने त्यांच्यावर सोपवलेली जिल्हा प्रसिद्धी व माध्यम अधिकारी पदाची जबाबदारी पूर्ण करत आरोग्य विभाग अंतर्गत येणाऱ्या विविध योजनाची व्यापक प्रमाणात प्रचार व प्रसिद्धी केली. त्याचप्रमाणे कोविड आपत्तीच्या परिस्थितीत साथरोग नियंत्रणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा राज्य आरोग्य व शिक्षण व संपर्क विभाग, पुणे येथे सहाय्यक संचालक यांच्या हस्ते राज्यस्तरावर प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सत्कार गुणगौरव करण्यात आला होता. राज्य शासनाच्या वतीने आता तिसऱ्यांदा गुणवंत कर्मचारी म्हणून मिलिंद लोणारी यांना गुणवंत कर्मचारी पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.