जळगाव शहरातील गणेश कॉलनी चौक परिसरात ‘शिव कॉलनी परिसर मित्र मंडळ’ आणि ‘महिला मंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य कीर्तन सोहळ्यात प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. शिवलीलाताई पाटील यांनी आपल्या ओघवत्या वाणीने जळगावकरांना मंत्रमुग्ध केले. सामाजिक प्रबोधन आणि भक्तीचा अनोखा संगम या कीर्तनाच्या माध्यमातून पाहायला मिळाला.
या धार्मिक कार्यक्रमाला शहरातील अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली. यामध्ये प्रामुख्याने आ. राजूमामा भोळे, नरेश सोनवणे, अनिता सोनवणे, माजी महापौर राखी सोनवणे, माजी नगरसेविका दीपमाला काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिवलिलाताईंचे स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सामाजिक कार्यकर्ते भिकन हिवराळे आणि जयश्री भिकन हिवराळे हे होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिव कॉलनी परिसर मित्र मंडळ आणि महिला मंडळाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. अत्यंत शिस्तबद्ध नियोजन आणि भक्तीमय वातावरणामुळे या सोहळ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

आपल्या कीर्तनातून शिवलीला ताई पाटील यांनी संत साहित्यातील दाखले देत समाज प्रबोधनावर भर दिला. आजच्या तरुण पिढीने संस्कारांची जोपासना कशी करावी आणि कौटुंबिक मूल्ये कशी टिकवावीत, यावर त्यांनी आपल्या खास शैलीत मार्गदर्शन केले. गणेश कॉलनी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने हा चौक भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता.













