जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना विषाणूला जिल्ह्यातून हद्दपार करण्याबरोबरच जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करुन जिल्हा विकासाच्या बाबतीत अग्रेसर राहील, याकरीता प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज केले.
भारतीय स्वातंत्र्याचा 74 वा वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी नेहा भोसले, जळगाव शहर महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यंवशी, उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, शुभांगी भारदे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता गाजरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, तहसीलदार सुरेश थोरात यांचेसह स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, कोरोनायोध्दे, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
लोकशाही आणखी बळकट करू या.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, आपल्या देशाच्या स्वातंत्र्याकरीता अनेकांनी आपले बलीदान दिले आहे. अनेक ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. या स्वातंत्र्य सैनिकांच्या सर्वांगीण प्रयत्नांमुळेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला पुढील वर्षी 74 वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय स्वातंत्र्यासाठी ही मोठी अतुलनीय बाब ठरणार आहे. भारताच्या स्वातंत्र्याबरोबर जगातील अनेक देशांना स्वातंत्र्य मिळाले. या देशांनी सुरवातीला लोकशाहीचा स्वीकार केला. कालांतराने या देशांना लोकशाहीची मूल्य जोपासता आली नाहीत. ती मूल्ये आपल्या भारत देशातील प्रत्येक नागरिकाने जोपासली आहेत. त्यामुळेच भारतासारखा विशालकाय देश एकसंघ राहू शकला. ही सर्व कमाल आपल्या लोकशाहीची आहे. म्हणूनच आपण आजपासून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवास सुरुवात करून लोकशाहीला आणखी बळकट करण्याचे आवाहन त्यांनी केले.
राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार
पालकमंत्री पुढे म्हणाले की, मागील काळात आपल्या जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत होता. जिल्हा प्रशासनाच्या अथक प्रयत्नांमुळे आता तो कमी झाला आहे. मात्र, दुसरे संकट आपल्यासमोर निर्माण होवू पाहत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाने ओढ दिली आहे. माझा बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. जून, जुलैत म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, ऑगस्टच्या 15 दिवसानंतरही पाऊस रुसलाच आहे. असेच चित्र राहिले, तर नैसर्गिक आपत्ती ओढावण्याची चिन्हे आहेत. मात्र, शेतकरी, नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार शेतकरी आणि नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.
पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे जिल्हावासियांना आवाहन
जिल्ह्यात खरीप हंगामात विविध पिकांची चांगल्याप्रकारे पेरणी झाली आहे. त्यासाठी लागणारी खते मुबलक उपलब्ध आहे. सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस पडलेला आहे. पीकांसाठी पावसाची नितांत आवश्यकता असल्याने आपण सर्वजण वरूण राजाला साकडे घालू या. याबरोबरच नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहनही त्यांनी जिल्हावासीयांना केले.
ई-पीक पाहणी प्रकल्प उपयुक्त
आजपासून जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात ई-पीक पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी होत आहे. या प्रकल्पामुळे खातेनिहाय व पीकनिहाय क्षेत्राची यादी उपलब्ध होवू शकणार आहे. यामुळे पीक कर्ज, पीक विमा योजना राबविणे किंवा पीक नुकसान भरपाई अदा करणे शक्य होणार आहे. याबरोबरच महसूल विभागाचा कणा असलेल्या तलाठी बांधवावरील कामाचा बोजा कमी होण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्र्यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या ‘विकेल ते पिकेल’ या योजनेसाठी ई-पीक पाहणी उपयुक्त ठरणार आहे. तसेच आधारभूत शासकीय खरेदी केंद्रावर शेतमाल विक्री सुलभीकरणासाठी ई-पीक पाहणी ॲप उपयुक्त ठरणार आहे. पीक माहितीच्या आधारे शासनस्तरावर कृषीविषयक कार्यक्षम धोरण आखण्यास मदत होणार असून हवामान, किड्यांचा प्रादुर्भाव व इतर रोगांवरील उपाययोजनांसाठी शेतकऱ्यांना तातडीने संदेश देणे शक्य होणार आहे.









