समाजकल्याण विभागाची माहिती
जळगाव (प्रतिनिधी) – विशेष घटक योजनेअंतर्गत निधी वितरण आणि खर्चाच्या निकषांवर जळगाव जिल्ह्याने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. २०२४-२५ साठी ९३०० लक्ष रुपये अर्थसंकल्पीय तरतूद असून जिल्ह्याला ५५८० लक्ष वाटप करण्यात आले आहेत, त्यापैकी ५३९८.७० लाख रुपयांचा खर्च झाला आहे. तो प्राप्त तरतुदीचा ९६.७५% इतका आहे. या निकषांवर आधारित गुणांकनात जळगाव जिल्ह्याने राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या अनुसूचित जाती उपयोजनेतील कामे प्रभावीपणे पार पाडण्यात जिल्हा प्रशासनाने उल्लेखनीय योगदान दिले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अभ्यासपूर्ण नियोजनामुळे हे यश जिल्ह्याला प्राप्त झाले आहे.
सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, निधीच्या नियोजनबद्ध खर्चामुळे जिल्ह्याने हे यश मिळवले आहे. योजनांचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस पावले उचलली असून, त्याचा परिणाम राज्यस्तरीय क्रमवारीत दिसून आला आहे.