सात हजार कोटींचा प्रकल्प, अजिंठा लेणीपर्यंत जलद प्रवास
जळगाव (प्रतिनिधी) : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जालना-जळगाव रेल्वे मार्गाला शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यामुळे खान्देश व मराठवाडा एकमेकांशी जोडला जाणार असून, प्रामुख्याने या परिरासतील पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. जागतिक वारसा असलेल्या अजिंठा लेणीपर्यंतचा प्रवास जलद व सुखकर होणार आहे. तसेच मराठवाड्याची गुजरात व मध्य प्रदेशसोबत कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.
जालना ते जळगाव नवीन रेल्वे मार्ग अनेक वर्षापासून प्रस्तावित होता. या प्रकल्पाची लांबी १७४ किलोमीटर आहे. याबाबत सर्वेक्षणदेखील झाले होते. तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दोन वर्षांपूर्वी या मार्गाची घोषणा केली होती. त्यानंतर दानवे यांनी ४० दिवसांत सर्व्हेसाठी साडेचार कोटी रुपये मंजूर केले होते.
दिनांक ८ फेब्रुवारी २०२२ रोजी फायनल लोकेशन सर्व्हेला मान्यता देत दिनांक १४ ते १८ मे २०२२ रोजी रडारद्वारे विक्रमी वेळेत सर्वेक्षण करण्यात आले होते. अंतिम सर्व्हेचा सविस्तर प्रकल्प अहवाल सप्टेंबर २०२२ मध्ये रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला होता. सुमारे सात हजार कोटींच्या या प्रकल्पासाठी राज्य सरकारने गेल्या वर्षीच ५० टक्के खर्चाची तरतूद केली आहे. उर्वरित ५० टक्के खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. जालना, पिंपळगाव, राजूर, भोकरदन, सिल्लोड, गोळेगाव, अजिंठा, फर्दापूर, पहुरमार्गे हा मार्ग जळगावपर्यंत पोहोचणार आहे.
असा असेल प्रकल्प
लांबी : १७४ किमी
स्टेशन : २२
नद्यांवरील पूल : ०३
(पूर्णा, अजिंठा, खडकी)
प्रकल्प : ७,१०६ कोटी.
राज्य सरकारचा ५० टक्के हिस्सा
मोठे पूल : ०३
६० लाख जणांना रोजगार
छोटे पूल : १३०
बोगदे : ०३
संपादित करावयाची जमीन : ९३५ हेक्टर