जळगाव कारागृहात खून, अनैसर्गिक अत्याचार समोर, हाणामारी तर नित्याचीच !
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा कारागृहात आज बुधवारी सकाळी एका कैद्याने दुसऱ्या बंद्याची हत्या केल्याचा धक्कदायक प्रकार सकाळी उघडकीस आला असून या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. त्यामुळे या कारागृहात गेल्या चार-पाच वर्षांपासून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे बंद्यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. हाणामारीत बंदीवानांचा मृत्यू, वादातून खून, क्षुल्लक गोष्टींमधून हाणामारी, जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न, बंद्यांचे पलायन,अनैसर्गिक अत्याचार अशा अनेक बाबी नित्याच्या बनल्या आहेत. त्यामुळे जळगाव उपकारागृह हे लोकसंख्येच्या दृष्टीने आणि न्यायालयीन बंद्यांच्या अतिरिक्त संख्येमुळे अपुरे पडत असल्याने याठिकाणी मध्यवर्ती कारागृह करण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
गेल्या पाच ते सहा वर्षांपासून तत्कालीन तुरुंग अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्या कारकिर्दीत चिन्या जगताप या बंद्याचा मारहाणीत मृत्यू झाला होता. याबाबत न्यायालयाच्या आदेशानुसार तत्कालीन तुरुंग अधिकारी पेट्रस गायकवाड यांच्यासह ५ कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आणखी एका घटनेत, जुना वाद उकरून काढत बंद्यांनी जळगाव जिल्हा जेलमध्ये राडा घातला. तीन बंद्यांनी एका बंद्यावर प्राणघातक हल्ला चढवत लोखंडी पट्टीने त्याला जखमी केल्याचेही समोर आले आहे.
यानंतर जिल्हा कारागृहात खुनाच्या गुन्ह्यासाठी अटकेत असलेल्या एका बंदीवर त्याच्या बॅरेकमध्ये असलेल्या इतर बंदीनी अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच कृत्याला विरोध केला म्हणून या बंदीच्या गळ्यावर धारदार पट्टीने वार केले. या घटनेची वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याचीही धमकी दिली आहे. या प्रकरणी चार बंदीविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी एका घटनेत, जिल्हा कारागृहातील महिला विभागातील बॅरेक क्रमांक २ मध्ये संशयित महिलेने न्यायालयीन कोठडीत असताना साडीचा काठ चिरून त्याची दोरी करत पंख्याच्या कडीला अडकवून गळफास घेतला. मात्र वेळीच महिला कर्मचारी यांच्या लक्षात आल्याने बंदी महिलेचा जीव वाचला. पुढील काही महिन्यांनी तीन बंद्यांनी एका बंद्यावर प्राणघातक हल्ला चढवत लोखंडी पट्टीने त्याला जखमी केल्याचे समोर आले होते. यात अट्टल गुन्हेगार असलेल्या बंद्यावर तीन बंद्यांनी लोखंडी पट्टी घेवून त्यांच्या तोंडावर व कंबरेवर वार करत गंभीर जखमी केले.
वरीलप्रमाणे अनेक घटना या गेल्या ५ ते ६ वर्षात जिल्हा कारागृहात घडलेल्या असून आता तर खुनाचीही घटना समोर आली आहे. तर अनेक घटना या समोरच येत नाही. त्यामुळे कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षितता आणि कारागृहाची कमी पडणारी जागा हा गंभीर विषय आता गृहखात्याने तातडीने लक्षात घेऊन उपाययोजना केल्या पाहिजे. यासाठी जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांनी प्रयत्न करून कारागृहाचा प्रलंबित विषय मार्गी लावावा अशी मागणी बंद्यांच्या नातेवाईकांकडून होत आहे. कारागृह अधीक्षक अनिल वांढेकर यांच्यासह मनुष्यबळ हे कारागृह व्यवस्थापनाला कमी पडत असल्याचे दिसून येत असून याकडे देखील गृह विभागाने लक्ष देऊन मनुष्यबळ वाढविण्याबाबत कार्यवाही करावी असेही मागणी होत आहे.
कारागृहात ४६४ बंदी
कर्मचाऱ्यांचे ७९ पद मंजूर असून ३६ पदे रिक्त आहेत. सध्या केवळ ४३ कर्मचारी असून त्यातही कोणी आजारी, सुटीवर तर कोणी रात्र पाळीला असते.
बंदी क्षमता २०० आहे. त्यात १८४ पुरुष आणि १४ महिला अशी आहे. मात्र आज सध्या पुरुष बंदी ४४७ आणि महिला बंदी १७ आहेत . एकूण ४६४ बंद्यांचाही समावेश आहे. यातही १५० बंदी नंदुरबार कारागृहात पाठविण्यात आले आहे.
खुनाच्या घटनेनंतर अधिकाऱ्यांची भेट
खुनाच्या घटनेनंतर निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णांत पिंगळे, जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी भेट दिली. पिंगळे यांनी शेखर मोघे याची चौकशी केली त्याच्याकडे कटरही सापडले, अशी माहिती पिंगळे यांनी दिली.
२ जुलै रोजी तपासणी केली त्या वेळी शस्त्र अथवा अन्य आक्षेपार्ह वस्तू आढळल्या नव्हत्या, हे शस्त्र भिंतीवरून फेकले असावे, अशी माहिती कारागृह अधीक्षक अनिल वांढेकर यांनी दिली.